'मनोज शब्दाचा पक्का, त्याला बळ देण्याचे काम आमचे'; छत्रपती संभाजी राजे थेट अंतरवालीत
By विजय मुंडे | Published: October 25, 2023 02:46 PM2023-10-25T14:46:51+5:302023-10-25T14:48:48+5:30
उपोषण करा. परंतु पाणी तरी घ्या, अशी विनंती छत्रपती संभाजी राजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली.
अंतरवाली सराटी (जि.जालना): तुम्ही आमरण उपोषण करा. परंतु पाणी तरी घ्या, तब्येतीची काळजी घ्या अशी विनंती छत्रपती संभाजी राजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली. शासनाला दिलेल्या ४० दिवसांच्या मुदतीत मराठा आरक्षण जाहीर झालेले नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी छत्रपती संभाजी राजे यांनी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
मी कोणाच्या सांगण्यावरून आलो नाही. एक जबाबदारी म्हणून मी आलो आहे. मराठ्यांना न्याय मिळून देण्यासाठी २००७ पासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. दीड वर्षांपूर्वी आपण स्वतः आमरण उपोषण केले होते. त्यामुळे आमरण उपोषण काय असते हे माहित आहे. कुटुंबापेक्षा समाजाला मोठा समजणारा मनोज आहे. त्यामुळे त्याच्या तब्येतीची काळजी आहे. म्हणून उपोषण जरूर करावे परंतू किमान पाणी प्यावे, तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली.
मनोज शब्दाचा पक्का
मनोज जरांगे पाटील यांची अनेक आंदोलने उपोषणे मी पाहिलेली आहेत. मनोज शब्दाचा पक्का आहे. समाजासाठी तो काम करतोय म्हणून त्याला बळ देण्याचे काम आमचे असल्याचेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.