मनोज जरांगेंची २० जानेवारीला मुंबईकडे कूच, २६ तारखेपासून प्रत्यक्षात उपोषणाला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:52 PM2023-12-25T12:52:14+5:302023-12-25T12:52:43+5:30
तीन कोटी समाजबांधव मुंबईला जाणार; मनोज जरांगे-पाटील यांचा दावा
वडीगोद्री (जि. जालना) : मुंबई येथे आमरण उपोषण करणार असून, २६ जानेवारीपासून प्रत्यक्षात उपोषणाला सुरूवात होईल. २० जानेवारीलाच अंतरवाली सराटी येथून सर्वजण निघणार असून, पाच ते सहा दिवसात मुंबईला पोहोचू. यासाठी दहा ते पंधरा दिवसांत नियोजन केले जाईल. मुंबईत जवळपास तीन कोटी समाजबांधव व दहा लाख गाड्या जाणार असल्याचा दावा मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केला.
शनिवारी बीड येथील सभा झाल्यानंतर मनोज जरांगे-पाटील हे अंतरवाली सराटीत आले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, बीडची सभा अप्रतिम झाली असून, मुस्लिम बांधवांनी खूप साथ दिली. क्युरिटिव्ह पिटीशन न्यायालयाने दाखल करून घेतल्याने तोही मराठा समाजबांधवांचा विजय आहे. क्युरिटिव्ह पिटीशनला आम्ही नाकारलेलेच नाही. २० जानेवारीपर्यंत मार्ग निघणार असेल तर चर्चेला हरकत नाही. आम्हाला मुंबईला जायची हौस नाही. आंदोलक म्हणून सरकारवर विश्वास ठेवावाच लागणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली.
सभेनंतर जरांगे-पाटील क्रिकेटच्या मैदानात
बीड येथील इशारा सभा झाल्यानंतर मनोज जरांगे-पाटील हे रविवारी सकाळी अंतरवाली सराटी येथे आले. यावेळी त्यांनी क्रिकेटचाही आनंद लुटला. त्यांनी फलंदाजी करत चांगली फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.