“२ तासांत पुढील निर्णय घेणार, फडणवीसांवर पश्चात्तापाची वेळ येईल”; जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 09:06 AM2024-02-26T09:06:53+5:302024-02-26T09:07:25+5:30

Manoj Jarange Patil News: देवेंद्र फडणवीसांविरोधात नाराजीची प्रचंड लाट उसळेल. देवेंद्र फडणवीसांना सुट्टी नाही, असे सांगत मनोज जरांगेंनी घणाघाती टीका केली.

manoj jarange patil criticized dcm devendra fadnavis again over maratha reservation | “२ तासांत पुढील निर्णय घेणार, फडणवीसांवर पश्चात्तापाची वेळ येईल”; जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल

“२ तासांत पुढील निर्णय घेणार, फडणवीसांवर पश्चात्तापाची वेळ येईल”; जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगेंच्या आरोपांवर उत्तर दिले. यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत येत्या दोन तासांत पुढील निर्णय घेणार असून, देवेंद्र फडणवीस यांना पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच केली आहे. अंतरवाली सराटीतून भांबेरी पर्यंत गेले असून, रविवारी रात्री समाज बांधवांच्या विनंतीनुसार भांबेरी गावात थांबले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रविवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचारबदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्यासह ५ जणांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

वैद्यकीय उपचार घेण्यास मनोज जरांगे तयार

भांबेरी गावातून भूमिका मनोज जरांगे यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच वैद्यकीय उपचार घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. संचारबंदी उठवा, मग मुंबईला येणारच. पुन्हा एकदा आम्ही लढायला सज्ज आहोत. रात्री काय डाव शिजला होता, याची कल्पना होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शहाणे व्हावे. संचारबंदीचा निर्णय मागे घ्यावा. आमच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी सोडावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. कायद्याचा मान ठेवायला हवा. पोलिसांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

आज मी जिंकलो, देवेंद्र फडणवीस हरले

आज मी जिंकलो, देवेंद्र फडणवीस हरले. सगेसोयरे याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. देवेंद्र फडणवीसांविरोधात नाराजीची प्रचंड लाट उसळेल. अधिवेशनाच्या आधी सगेसोयरेबाबत निर्णय घ्यावा. देवेंद्र फडणवीसांच्या माहितीशिवाय जिल्हाधिकारी संचारबंदीचा निर्णय घेऊ शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्यात दम नाही. हे छत्रपती शिवरायांचे राज्य आहे. राज्यकर्त्यांना असले वागणे शोभत नाही. त्यांचा डाव आम्ही आधीच ओळखला, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांना सुट्टी नाही

जनता कामे केल्यावर आदर देते. देवेंद्र फडणवीसांनी असले धंदे बंद करावेत. देवेंद्र फडणवीसांना सुट्टी नाही. देवेंद्र फडणवीसांना आता हरवायचे आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही. राज्यासह देशात त्यांना अडचणीत आणू. जनतेचा अंत पाहू नये. संचारबंदी लावून सरकार चालवण्यात कसली मर्दानगी आहे, असा सवाल करत, त्यांच्यात दम नाही, ते पोलिसांच्या आडूनच कामे करणार, असे अनेक गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केले.

दरम्यान, अंतरवाली सराटीत परतण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे. तसेच तिथे जाऊन एक बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलकांनी शांत राहावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.
 

Web Title: manoj jarange patil criticized dcm devendra fadnavis again over maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.