मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषणास्त्र; सरकारला दिलेली मुदत संपली, अंतरवाली सराटीत आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 06:06 AM2023-10-26T06:06:33+5:302023-10-26T06:07:50+5:30
गिरीश महाजन यांनी साधला संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क, अंतरवाली सराटी (जि. जालना) : दिलेल्या मुदतीत मराठा आरक्षण न दिल्याने अंतरवाली सराटी येथील आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आमरण उपोषण सुरू होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्याशी मोबाइलद्वारे संवाद साधला. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांवर शासन सकारात्मक असून, टोकाची भूमिका घेऊ नये, अशी विनंती महाजन यांनी केली.
महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण देण्याच्या मागणीसाठी २८ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. शासनाला ४० दिवसांची मुदत दिल्याने साखळी उपोषण केले जात हाेते. परंतु, मागण्या मान्य न झाल्याने ४१ व्या दिवशी बुधवारी सकाळी ११ वाजता मनोज जरांगे पाटील यांनी साखळी उपोषणाचे रुपांतर पुन्हा आमरण उपोषणात केले आहे.
मनोज शब्दाचा पक्का : संभाजीराजे छत्रपती
संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी दुपारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज हा शब्दाचा पक्का आहे. त्याला बळ देण्यासाठी मी इथं आलो. तुम्ही आमरण उपोषण करा; परंतु, पाणी प्या, तब्येतीची काळजी घ्या, अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर जरांगे यांनी पाणी पिले.
आरक्षण शंभर टक्के द्यायचं आहे
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी शासन सकारात्मक आहे. शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे. परंतु, तुम्ही टोकाची भूमिका घेत उपोषण करू नका. दोन दिवसात इतर प्रश्न मार्गी लागतील. भावनेच्या भरात नाही तर त्या आरक्षणाला कोणी चॅलेंज करणार नाही, असे आरक्षण द्यायचे आहे, असे सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाऐवजी साखळी उपोषण करावे, अशी विनंती केली.
जरांगे म्हणाले...
नेत्यांनी सांगितल्यानुसार आम्ही ४० दिवसांचा वेळ शासनाला दिला. परंतु ४१ दिवसांनंतरही आरक्षण जाहीर झालेले नाही. दोन दिवसांत गुन्हे मागे घेणे असो किंवा सभेवेळी झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, त्यावरही शासनाने निर्णय घेतलेला नाही. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या १६ ते १७ युवकांच्या कुटुंबीयांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही.
शासन समाजाची दिशाभूल करीत असून, आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. उपोषणात अन्न-पाण्याचा त्याग करणार असून, उपचारही घेणार नाही. युवकांच्या आत्महत्यांना दिशाभूल करणारे सरकार जबाबदार आहे. - मनोज जरांगे-पाटील, नेते,
मराठा आरक्षण आंदोलन.