मनोज जरांगे आजचा दिवस पाणी पिणार...; संभाजीराजे छत्रपतींच्या विनंतीला दिला मान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 04:46 PM2023-10-25T16:46:22+5:302023-10-25T16:48:13+5:30
मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर आज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली.
मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर आज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मी प्रामाणिकपणे येथे आलोय, काही मदत लागली, तर सांगा, असं संभाजीराजे यांनी सांगितले. तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी प्रयत्नशील, असं संभाजीराजे जरागेंना म्हणाले.
छत्रपतींचा वंशज म्हणून ही माझी जबाबदारी आहे. मनोज जरांगेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहीले पाहिजे. जरांगेंनी उपोषण करावे, पण किमान पाणी तरी प्यावे, अशी विनंती देखील संभाजीराजे यांनी यावेळी केली. संभाजीराजेंच्या या विनंतीला जरांगेंनी देखील मान दिला. यावेळी जरांगे यांनी आजचा दिवस पाणी पिऊन आपण राजेंचा शब्द मोडत नसल्याच सांगिंतलं. आज पाणी ग्रहण केलं, मात्र उद्यापासून आपण पाणीही घेणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले आहेत. मात्र सरकारने यावर कसल्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने आपण स्थगित केलेल्या आमरण आणि साखळी उपोषणाचे रुपांतर आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणात करत आहोत, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. मराठा समाजाच्या आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र चाळीस दिवस होऊनही ते मागे घेतलेले नाहीत.म्हणजेच सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा याचा अर्थ आहे, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे, यासाठी आपला लढा सुरू आहे. परंतु, आत्महत्या होत असतील तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नयेत. आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. तसेच नेतेमंडळींना गावबंदी करा, कायदा हातात घेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या १६ ते १७ युवकांच्या कुटुंबियांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही. एकूणच आजवर एकाही आश्वासनाची पूर्तता शासनाकडून झालेली नाही. यामुळे आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले जात आहे.