मनोज जरांगे अंतरवालीत पोहचले; मराठा समाज बांधवांना महत्त्वाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 09:26 AM2024-02-26T09:26:05+5:302024-02-26T09:29:05+5:30

जरांगे यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

Manoj Jarange reached Antarwali; An important appeal to the Maratha community | मनोज जरांगे अंतरवालीत पोहचले; मराठा समाज बांधवांना महत्त्वाचं आवाहन

मनोज जरांगे अंतरवालीत पोहचले; मराठा समाज बांधवांना महत्त्वाचं आवाहन

जालना - मराठा आरक्षणासाठी बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे रविवारी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझा बळी घ्यायचा आहे, त्यासाठी मी सागर बंगल्यावर येतो, असे म्हणत ते अंतरवालीतून मुंबईकडे निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांना चक्कर आल्यानंतर त्यांनी रात्रीचा मुक्काम भांबेरी गावात केला. त्यानंतर, आज सकाळी ते पुन्हा मुंबईकडे निघाले होते. अखेर, समर्थकांच्या, पोलिसांच्या आवाहनानंतर भांबेरी गावातून जरांगे परत फिरले असून अंतरवाली सराटीत पोहोचले आहेत. पुढील काही तासांतच ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.  

जरांगे यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मला सलाईनमधून विष देऊन ठार मारण्याचं कारस्थान होतं, असा गभीर आरोप जरांगे यांनी केला होता. त्यानंतर, ते अंतरवालीतून मुंबईतील सागर बंगल्याकडे निघाले होते. मात्र, रात्रीच त्यांना चक्कर आल्यामुळे त्यांचा भांबेरी येथे मुक्का झाला. आज सकाळी जरांगे यांनी माध्यमांंशी संवाद साधला. ''उपमुख्यमंत्र्याच्या सांगण्यावरून अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. सर्वांनी शांत राहावे पोलिसांना त्रास देऊ नये. अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू,'' अशी भूमिका घेत जरांगे पाटील पुन्हा अंतरवालीत पोहोचले आहेत. यावेळी, आज पुन्हा एकदा जरांगे यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, मराठा समाज बांधवांना शांत राहण्याचं आणि घरी जाण्याचं आवाहनही केलं आहे. राज्यभरातील मराठा बांधवांनी शांत राहाव, अंतरावालीत बैठक घेऊन आपण पुढील दिशा ठरवू, असेही त्यांनी म्हटले. मुंबईकडे जाण्याच्या निर्णयावरही ते पुढील काही तासांत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. 

जरांगे पाटील यांनी सोमवारी सकाळी भांबेरी येथे माध्यमांची संवाद साधला. सरकारने सांगितल्याशिवाय जिल्हाधिकारी संचार मधील लागू करू शकत नाहीत. आम्ही मुंबईकडे येऊ नये म्हणून संचार बंदी लावली आहे. रात्री मोठया प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता. परंतु, आपण  रात्रीच त्यांचा असलेला वेगळा प्लॅन उधळून लावला आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांनी शांततेत आंदोलन करावे, पोलिसांना त्रास देऊ नाये, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय त्यांना सुट्टी नाही, असे म्हणत जरांगे यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं. आज मी जिंकलो, फडणवीस हरले. सगसोयरेसह आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीसांना सुट्टी नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.  

आरोप बिनबुडाचे - फडणवीस

मनोज जरांगे पाटील हे शरद पवार, उद्धव ठाकरे यांची स्क्रिप्ट बोलत आहेत. त्यांच्या विधानांमागील षडयंत्राचा लवकरच पर्दाफाश होईल, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्र परिषदेत केला. कायदा- सुव्यवस्था बिघडविण्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना माफ केले जाणार नाही, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. तसेच, माझ्यावर त्यांच्याकडून करण्यात येत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत, हे त्यांनाही माहिती आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले.

Web Title: Manoj Jarange reached Antarwali; An important appeal to the Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.