'पाटील मामा पाणी घ्या!' मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने चिमुकलीची विनवणी
By विजय मुंडे | Published: February 13, 2024 06:34 PM2024-02-13T18:34:41+5:302024-02-13T18:35:36+5:30
प्रकृती खालावली असली तरी जरांगे यांनी उपचार, पाणी घेण्यास नकार दिला आहे
वडीगोद्री (जि.जालना) : उपोषणाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजीही जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला. जरांगे यांनी किमान पाणी तरी प्यावे, यासाठी महिलांसह ग्रामस्थांनीही विनावणी केली. परंतु, जरांगे यांनी त्यांना नकार दिला. विशेष म्हणजे उपोषण स्थळाशेजारी राहणारी दीड वर्षीय काव्य या मुलीनेही एक तास जरांगे पाटील यांच्या जवळ बसून पाटील मामा, पाणी घ्या, अशी विनवणी केली. काव्या जरांगे पाटील यांच्या डोक्यावरून हात फिरवत पाणी पिण्याची विनवणी करीत असताना महिलाही भावूक झाल्या होत्या.
सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मंगळवारी जिल्हास्तरावरील वैद्यकीय पथक अंतरवाली सराटी गावातील उपोषणस्थळी आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी आरोग्य तपासणी करू देण्याची विनंती केली. परंतु, जरांगे पाटील यांनी तपासणी करण्यास नकार दिला. आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी किमान पाणी प्यावे, यासाठी महिला, ग्रामस्थांनीही विनवणी केली. परंतु, त्यांनाही जरांगे पाटील यांनी नकार दिला.
विभागीय अयुक्तांनी साधला संवाद
विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून पाणी व उपचाार घेण्याची विनंती केली. यावेळी मनोज जरांगे यांनी नकार दिला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर उपस्थित होते.