मनोज जरांगे यांच्या सभेचे नियोजन, १०० एकरांत विराट सभा
By विजय मुंडे | Published: October 13, 2023 08:31 PM2023-10-13T20:31:25+5:302023-10-13T20:31:33+5:30
मनोज जरांगे यांना प्रवेश करण्यासाठी ३ फूट उंचीचे ५०० फूट लांब रॅम्प करण्यात आले आहे.
जालना: धुळे-सोलापूर महामार्गावरील अंतरवाली सराटी परिसरातील रामगव्हाण रोडवरील १०० एकरांत शनिवारी दुपारी १२ वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. सभेसाठी १० फूट उंचीचे व्यासपीठ उभे करण्यात आले आहे. तसेच जरांगे यांना प्रवेश करण्यासाठी ३ फूट उंचीचे ५०० फूट लांब रॅम्प करण्यात आले आहे.
८० एकरावर वाहन पार्किंग
वडीगोद्री कृषीउत्पन्न बााजर समितीच्या आवारातील ६२ एकर, धुळे-सोलापूर महामार्गावरील दोदडगाव येथे ६ एकर, सभास्थळाजवळ शिवारात ६ एकर, रामगव्हाण येथे ६ एकर, गरजेनुसार समर्थकारखाना अंकुशनगर, वडीगोद्री- जालना महामार्गावरील धाकलगाव शिवारात गरजेनुसार वाहनांची पार्किंग केली जाणार आहे.
१० हजार स्वयंसेवक
या सभेच्या नियोजनासाठी सभास्थळी दहा हजार स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. शिवाय पाच लाख पाणी बॉटल्स, ५० पाण्याचे टँकर राहणार आहेत.
११० रुग्णवाहिका
सभास्थळी व परिसरात तब्बल ११० रुग्णवाहिका राहणार असून, यात ३५ रुग्णवाहिका या कार्डियाक आहेत. ३०० डॉक्टर, ३०० परिचारिकांचा स्टाफ कार्यरत राहणार आहे. शिवाय अत्यावश्यक सेवेसाठी ४० खाटा राहणार आहेत. अग्निशमन विभागाची १० वाहनेही नियुक्त करण्यात आले आहेत.
२५ माेठे स्क्रीन
सभास्थळावर १००० लाऊड स्पीकर लावण्यात आले असून, विविध ठिकाणी २५ मोठे स्क्रीन राहणार आहेत. सभास्थळावर येण्यासाठी ७ प्रवेशद्वार करण्यात आले आहेत.
मुक्कामाच्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था
अनेक मराठा समाजबांधव मुक्कामी येत आहेत. मुक्कामी येणाऱ्या समाजबांधवांसाठी वडीगोद्री, अंकुशनगर, महाकाळा आदी ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
सभास्थळी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस अधीक्षकांसह तीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक, ६ डीवायएसपी, २१ पोलिस निरीक्षक, ५७ सहायक पोलिस निरीक्षक व फौजदार, १००० पोलिस अंमलदार, २०० वाहतूक शाखेचे कर्मचारी, ‘एसआरपीएफ’ची एक तुकडी, ‘बीडीडीएस’चे चार पथके कार्यरत राहणार आहेत. शिवाय चार ड्रोनद्वारे सभास्थळाच्या परिसरात पाहणी केली जाणार आहे.