मंठा बसस्थानकाचे रूपडे पालटणार ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:44 AM2019-01-01T00:44:15+5:302019-01-01T00:45:20+5:30
मंठा बसस्थानकाचे अद्ययावत स्वरूपाचे बांधकाम होणार आहे.
ल्ोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील मंठा बसस्थानकाचे अद्ययावत स्वरूपाचे बांधकाम होणार आहे. यासाठी ३ कोटी ३१ लाख ३८ हजार २०० रूपयांच्या प्रस्तावाला नुकतीच मुंबई कार्यालयाकडून मंजुरी मिळाली आहे. यामुळे येथील ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
जालना जिल्ह्यात जालना, अंबड, परतूर, शहागड, घनसावंगी व जाफराबाद या ठिकाणी एसटी महामंडळाचे बसस्थानक आहे. यापैकी मंठा बसस्थानकाचे बांधकाम सन १९६१- ६२ मध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे करण्यात आले होते. त्यामुळे या बसस्थानकाचे अद्ययावत स्वरूपाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी येथील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे केली होती. अखेर नोव्हेंबर महिन्यात रा. प. म. जालना विभागातर्फे ३ कोटी ३१ लाख ३८ हजार २०० रूपयांचा प्रस्ताव रा. प. म. मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.
या प्रस्तावाला आता मुंबई कार्यालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे तातडीने निविदा कार्यवाही हाती घेऊन बांधकामाला सुरूवात करण्यात येणार असून एका वर्षभरात बांधकाम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रवाशांसह कर्मचा-यांना मिळणार सुविधा
नवीन प्रसाधन गृह, बसस्थानक परिसरात सिमेंट काँक्रीटीकरणाचा रस्ता, कर्मचाºयांसाठी विश्रांती गृह व प्रवाशांसाठी सर्व सुविधा युक्त हे बसस्थानक बांधण्यात येणार आहे.
मंठा येथील बसस्थानकाचे बांधकाम सन १९६१- ६२ च्या दरम्यानचे असल्यामुळे फार जुनाट झाले होते. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून याच्या बांधकामाची मागणी नागरिकांमधून होत होती.