मंठा तालुक्याला गारपिटीने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:22 AM2020-03-20T00:22:54+5:302020-03-20T00:23:19+5:30
तालुक्यातील सात गावांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, गहू, टरबूज, या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : तालुक्यातील सात गावांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, गहू, टरबूज, या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. बाधित झालेल्या गावाचा अहवाल तहसील कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
तालुक्यातील सात गावांमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसील कार्यालयाने वर्तवला आहे. बाधित झालेल्या गावांमध्ये केंधळी, ब्रह्मनाथ तांडा, मंठा, टोकवाडी, वाई, धोंडी पिंपळगाव या ७ गावांचा समावेश असून, अन्य गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल तलाठी व कृषी सहायकांनी दिल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली.
सद्य स्थितीत तालुक्यामधील गहू, हरभरा, ज्वारी, टरबूज इ. पिकांचे १४९० हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना एक कोटी ७८ लाख ८०० रुपये नुकसान भरपाईची मागणी तहसील प्रशासनाकडून करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयाचे टी.व्ही. दवणे यांनी दिली. हा पाऊस हेलस, रानमळावाडी, उंबरखेडा, पाटोदा, मंठासह अनेक गावांमध्ये झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
मंठा तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीचा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीटग्रस्त शेतक-यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी सांगितले. त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली.