अंगणवाडीतील अनेक पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:20 AM2021-06-23T04:20:33+5:302021-06-23T04:20:33+5:30
कारवाईची मागणी बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात जुगाराचे डाव रंगू लागले आहेत. अनेक युवक जुगाराच्या आहारी जात असून, त्यात ...
कारवाईची मागणी
बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात जुगाराचे डाव रंगू लागले आहेत. अनेक युवक जुगाराच्या आहारी जात असून, त्यात अनेकांचे नुकसान होत आहे. जुगारासह इतर अवैध धंदे ही जोमात सुरू आहेत. ही बाब पाहता पोलीस प्रशासनाने जुगारासह इतर अवैध धंदे चालविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सुभाष देविदान यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
जालना : येथील अखिल भारतीय मारवाडी संमेलनाच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष देविदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघटनमंत्री वीरेंद्रप्रसाद धोका यांनी ही नियुक्ती केली आहे. मराठवाडा संपर्कप्रमुख चंदूलाल बियाणी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देविदान यांचा मारवाडी युवा मंचतर्फे सत्कार करण्यात आला.
वैष्णवी गाडेकर हिचे प्रज्ञाशोध परीक्षेत यश
जालना : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. जालना शहरातील टाऊन हॉल परिसरातील सरस्वती भुवन प्रशालेची विद्यार्थिनी वैष्णवी कैलास गाडेकर हिने यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल जयश्री गाडेकर, आनंद काळे यांच्यासह आनंदी स्वामी महाराज भक्त मंडळाच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे.
रोहित नलावडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
जालना : ओबीसी मोर्चा युवक जिल्हाध्यक्षपदी रोहित नलावडे यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडपत्र आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष संतोष दानवे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, सतीश केळकर आदींनी कौतुक केले आहे.
अंबड येथे मोकाट कुत्र्यांचा चावा
अंबड : नूतन वसाहत परिसरात एका मोकाट कुत्र्याने आतापर्यंत दहा ते १५ जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. नूतन वसाहत परिसरातील मत्स्योदरी ज्ञानमंदिर शाळा परिसरात मोकाट कुत्रे दिवसरात्र फिरत आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला, लहान मुलांमध्ये भीती पसरली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
खरेदी-विक्री व्यवहार ठप्प
बदनापूर : तालुक्यात मागील महिनाभरापासून जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला इंटरनेट समस्येचे ग्रहण लागले आहे. येथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील इंटरनेट प्रणाली बंद झाल्याने खरेदी- विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. नागरिकांसह शेतकऱ्यांना कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मागण्यांचे निवेदन
बदनापूर : ग्रामपंचायत काळातील अनेक सफाई कामगार नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून तुटपुंज्या मानधनावर सेवा बजावत आहेत. अशा कामगारांना तातडीने कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन न.प. प्रशासनाला दिले.