चोरांनी पोलिसाचेच घर केले साफ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:06 AM2017-12-29T00:06:02+5:302017-12-29T00:06:28+5:30

तालुक्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत एकाच रात्री पाच गावांमध्ये घरफोड्या केल्या. एवढ्यावरच न थांबता एका पोलिसाचे घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास केला

Many housebreakings in 5 villages | चोरांनी पोलिसाचेच घर केले साफ !

चोरांनी पोलिसाचेच घर केले साफ !

googlenewsNext

भोकरदन : तालुक्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत एकाच रात्री पाच गावांमध्ये घरफोड्या केल्या. एवढ्यावरच न थांबता एका पोलिसाचे घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास केला. बुधवारी मध्यरात्री सिपोरा बाजारसह अन्य चार गावांमध्ये हा प्रकार घडला.
तालुक्यातील सिपोरा बाजार, आन्वा, जळगाव सपकाळ, वाकडी व पिंपळगाव रेणुकाई या पाच गावांमध्ये बुधवारी रात्री एक ते तीनच्या दरम्यान चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोड्या केल्या. वाकडी येथील सांडू शामजी दागे हे पत्नीसह मुंबईला रुग्णालयात गेले असता, चोरट्यांनी घराची कुलूप तोडून रोख रक्कम व दागिने चोरून नेले. दांडगे दाम्पत्य बाहेरगावी असल्यामुळे चोरीस गेलेली नेमकी रक्कम कळू शकली नाही. कोदोली येथे एका ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला, तर पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव रेणुकाई येथील विनायक कृषी सेवा केंद्राचे शटर उचकटून चोरट्यांनी किरकोळ साहित्य चोरून नेले. जळगाव सपकाळ येथील डॉ. नरेंद्र सपकाळ यांच्या दवाखान्यातील पाच हजारांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. आन्वा येथील आजूबाई ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी वीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला, तर शिवाजी सिल्लोडे यांच्या घरातील पाच हजारांचे साहित्य ढापले.
चोरीच्या घटनांबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे, निरीक्षक दशरथ चौधरी, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे, डी़जे़ शिंदे यांनी घटनास्थळांना भेटी दिल्या. औरंगाबाद येथील श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
पोलिसाच्या घरावरही डल्ला
सिपोरा बाजार येथील पोलीस कर्मचारी साहेबराव कड हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेले असता, घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन लाख ६८ हजार रूपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख वीस हजार, असा एकूण २ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
दरम्यान गावातील एकाने चोरट्यांना दुचाकीवरून पळून जाताना पाहिले. या प्रकरणी दिलीप कड यांच्या तक्रारीवरून भोकरदन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Many housebreakings in 5 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.