थर्टीफर्स्टला अनेकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:37 AM2018-01-02T00:37:21+5:302018-01-02T00:37:26+5:30
थर्टीफर्स्ट नाईटला रविवारी रात्री झिंगत घरी जाणा-यांची रात्री गुन्हे शाखेने कसून तपासणी केली
जालना : थर्टीफर्स्ट नाईटला रविवारी रात्री झिंगत घरी जाणा-यांची रात्री गुन्हे शाखेने कसून तपासणी केली. थेट ब्रेथ अॅनालायझर लावून अल्कोहोलचे शरीरातील प्रमाण तपासण्यात आले. यात बहुतांश तरुणांनी अधिक प्रमाणात अल्कोहोल घेतल्याचे आढळून आले.
नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी अनेकजण थर्टीफर्स्ट नाईटला पार्ट्यांचे बेत आखतात. जालना शहरातही रविवारी रात्री बहुतांश हॉटेल-ढाबे हाऊसफुल्ल होते. नववर्षाचे स्वागत करून रात्रीच्या वेळी नशेत भरधाव वाहन चालवत घरी जाताना अपघाताच्या घटनांचा पूर्वानुभव लक्षात घेता, पोलिसांनी रविवारी रात्री विशेष तपासणी मोहीम राबवली. शहरातील औरंगाबाद चौफुली, भोकरदन नाका, बसस्थानक, मामा चौक, गांधी चमन परिसरात दुचाकीवरून रात्री जाणा-यांची पोलिसांनी तपासणी केली. ठिकठिकाणी सुमारे चाळीस जणांची तपासणी करण्यात आली. यात बहुतांश तरुणांनी प्रमाणापेक्षा अधिक अल्कोहोल घेतल्याचे आढळून आले. तर काही जणांकडे वाहनाची कागदपत्रे व परवाना नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या प्रकरणी विशाल रमेश मिसाळ, सुदर्शन पाटीलबा भुंबर व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, कृती दलाचे यशवंत जाधव, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सदर बाजार ठाण्याचे महादेव राऊत यांच्यासह कर्मचा-यांनी या कारवाईत सहभाग घेतला.