हरवलेला संवाद अन् ताणतणावामुळे अनेकांना मानसिक आजाराची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 01:13 AM2019-10-10T01:13:51+5:302019-10-10T01:14:41+5:30
विविध कारणांनी मानसिक आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्पर्धेच्या युगात सोयी-सुविधा वाढत असल्या तरी कौटुंबिक, सामाजिक संवाद कमी होऊ लागला आहे. परिणामी विविध कारणांनी मानसिक आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हा रूग्णालयात गत सहा महिन्यात विविध मानसिक आजारांनी त्रस्त झालेल्या पाच हजारावर रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
स्पर्धेच्या युगात मानवाचे जीवनमान पूर्णत: बदलून गेले आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत काम आणि सोशल मीडियाच्या जगात वावरणाऱ्या अनेकांना विविध मानसिक आजारांनी ग्रासले आहे. दैनंदिन ताणतणाव, शेतीतील उत्पन्न घटने, कर्जाचा बोजा वाढणे, उत्पन्नाची इतर साधने नसणे, दीर्घकालीन आजार, सतत होणारे कौटुंबिक वाद यासह इतर अनेक कारणांनी विविध मानसिक आजार जडणा-या रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जात आहेत. मानसिक आजारांनी ग्रासलेले रूग्ण अनेक वेळा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलतात. त्यामुळे अशा रूग्णांवर वेळेत आणि नियमित औषधोपचार घेण्याची गरज आहे.
जिल्हा रूग्णालयातील मानसोपचार विभागातील अंतररूग्ण व बाह्यरूग्ण विभागात दैनंदिन अनेक रूग्ण उपचारासाठी येतात. एप्रिल ते सप्टेंबर अखेरपर्यंत पाच हजारावर रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यात बाह्यरूग्ण विभागात नियमित येणारे ७९३ तर नवीन २८७ रूग्ण उपचार घेत आहेत. अंतररूग्ण विभागात ३९२८ रूग्ण नियमित उपचार घेत आहेत. मानसिक आजार किती प्रमाणात आहे, त्यानुसार रूग्णावर दोन वर्षे ते पाच वर्षापर्यंत उपचार केले जातात. अनेक आजारात आयुष्यभर उपचार घ्यावे लागतात.
मानसिक आजाराची लक्षणे
अवास्तव भीती वाटणे, चिडखोरपणा वाढणे, झोपेची गरज कमी होणे, विनाकारण धोका पत्करणे, सतत चिंताग्रस्त राहणे, उदासिन राहणे, उन्मादपणा वाढणे, व्यसनाधीनता वाढणे ही मानसिक आजाराची लक्षणे आहेत. तसेच लहान मुलांमध्ये मतिमंदपणा, झोपेत दचकून उठणे, अडखळत बोलणे, बालगुन्हेगारी, रात्री झोपेत चालणे आदी.
असे राहील मानसिक आरोग्य उत्तम
संतुलित व योग्य आहार घ्यावा, नियमित व्यायाम, योगा करावा, पुरेशी झोप घ्यावी, कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढवावा, आशावादी-सकारात्मक विचार करावेत, सामाजिक संबंध ठेवावेत, भावनिक नियंत्रण मिळवावे, अति संवेदनशीलता टाळावी, स्वत:च्या मूल्यांचा शोध घ्यावा तसेच निर्व्यसनी राहिले तर मानवाचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.