टेंभुर्णीत अनेकजण तापाने फणफणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:03+5:302021-09-15T04:35:03+5:30
टेंभुर्णी : टेंभुर्णीसह परिसरातील गावातील अनेक नागरिक सध्या तापेने फणफणले आहेत. घराघरात रूग्ण असल्याने सरकारी रूग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्ये गर्दी ...
टेंभुर्णी : टेंभुर्णीसह परिसरातील गावातील अनेक नागरिक सध्या तापेने फणफणले आहेत. घराघरात रूग्ण असल्याने सरकारी रूग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्ये गर्दी वाढत आहे.
मागील एक महिन्यांपासून टेंभुर्णी परिसरात तापेच्या रूग्णांची संख्या सारखी वाढत आहे. सर्दी, खोकल्यासह पांढऱ्या पेशी कमी होणे, हिमोग्लोबिन कमी होणे आदी लक्षणे रुग्णांत दिसून येत आहेत. टेंभुर्णीसह परिसरात पावसामुळे सध्या डासांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे डेंग्यू तापाची शक्यताही डॉक्टर बोलून दाखवित आहेत. अनेक रुग्णांत डेंग्यू सदृश लक्षणे दिसून येत आहेत. यात बालक रुग्णांची संख्याही मोठी आहे. तापेच्या लाटेमुळे सध्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
डासांच्या निर्मूलनासाठी ग्रामपंचायत मार्फत संपूर्ण गावात दर आठवड्याला फॉगिंग मशीनने फवारणी करणे गरजेचे आहे. शिवाय आरोग्य विभागामार्फत ही गावात जनजागृती करुन कोरडा दिवस पाळणे आदींबाबत जनतेला आवाहन करण्याची गरज आहे.
कोट
टेंभुर्णी ग्रामीण रूग्णालयातील बाह्य रूग्ण विभागात दैनंदिन तपासणीसाठी येणाऱ्या रूग्णांमध्ये तापीच्या रूग्णांची संख्या अधिक आहे. हा आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी घरासह परिसर स्वच्छ ठेवावा, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. काही शारीरिक त्रास होत असेल तर घरगुती उपचार न करता तज्ज्ञांमार्फत उपचार घ्यावेत.
डॉ.अमोल वाघ, ग्रामीण रूग्णालय, टेंभुर्णी.