दगडफेक, जाळपोळ अन् रास्ता रोको; अंतरवाली सराटीत चूल पेटलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 08:44 AM2023-09-03T08:44:19+5:302023-09-03T08:44:51+5:30

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीमार केला अन् गाव राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आले.

Many women's heads split open due to police baton attack. Swollen hands and feet of children. | दगडफेक, जाळपोळ अन् रास्ता रोको; अंतरवाली सराटीत चूल पेटलीच नाही

दगडफेक, जाळपोळ अन् रास्ता रोको; अंतरवाली सराटीत चूल पेटलीच नाही

googlenewsNext

अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) : सोलापुर-धुळे राष्ट्रीय महामार्गवरील वडीगोद्रीपासून अंतरवाली सराटी गाव तीन किलोमीटर अंतरावर. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीमार केला अन् गाव राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आले. लोकसंख्या ५ हजार. मतदान ३२००. गावात ४० टक्के मराठा समाज. अनुसूचित जाती २० टक्के, ओबीसी ३० टक्के आणि इतर १० टक्के असा संमिश्र समाज गुण्यागोविंदाने नांदतो.

गावातील वयोवृद्ध मुरलीधर तारख हे शेतकरी शुक्रवारी दिवसभर आंदोलन स्थळी होते. ते म्हणाले, आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. पोलिस गावात येऊन चौकशी करून जात होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. डॉक्टरांनी तपासणी केली. पोलिसांच्या आग्रहामुळे उपोषणकर्त्याने पाणी पिले. त्यानंतर पोलिस निघून गेले. मोठ्या संख्येने आलेल्या पोलिसांना सहा जार पाणी पाजले. त्यानंतर ४ वाजेच्या सुमारास गावाच्या तीन बाजूंनी फौजफाटा घेऊन पोलिस आले. दिसेल त्याला झोडपले. 

गावात शुकशुकाट
गावात प्रवेश करतानाच कमानीच्या आत मारोती मंदिराच्या बाजूलाच उपोषणस्थळ. शुक्रवारच्या घटनेनंतर अख्खे गावच उपोषणस्थळी बसून आहे. त्यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. 

३६६ आंदोलकांवर [अंतरवाली सराटीतील] गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे नोंदवताना अत्यंत गंभीर कलमे लावण्यात आली.
लावलेली कलमे अशी : खुनाचा प्रयत्न (कलम ३०७) | सरकारी नोकरावर हल्ला (गंभीर जखमी) कलम ३३३ | जखमी करणे (कलम ३३२) | शासकीय कामात अडथळा (कलम ३५३) | मालमत्ता नुकसान (कलम ४२७) जाळपोळ (कलम ४३५) | गुन्ह्याचा कट करणे (कलम १२०-ब) | गैरकायद्याची मंडळी (कलम १४३) | दंगल घडवणे (कलम १४७) | हत्यारासह दंगल (कलम १४८) | दंगलीची सामायिक जबाबदारी (कलम १४९)

महिलांची डोकी फुटली, मुलांचे हातपाय सुजले
पोलिसांच्या लाठीहल्ल्यात अनेक महिलांची डोकी फुटली. लहान मुलांचे हातपाय सुजले. गावातील ओट्ट्यांवर बसलेल्यांनाही घेरून मारण्यात आले. या हल्ल्यानंतरही गावकऱ्यांचे मनोबल खचलेले नाही. उलट आणखी त्वेषाने लढा द्यायचा निर्धारच गावकऱ्यांनी केला आहे.

हिरकणी बस पेटवली
छत्रपती संभाजीनगरात मध्यवर्ती बसस्थानकात उभी कोल्हापूर-औरंगाबाद हिरकणी बस अज्ञातांनी पेटवून दिली. जिल्ह्यातील एसटी गाड्याच्या ९५९ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांनी क्रांती चौकात निदर्शने केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेसच्या शिष्टमंडळांनी विभागीय आयुक्तांना भेटून निवेदन दिले.  सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंद पुकारण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत शनिवारी सर्वानुमते घेण्यात आला. 

Web Title: Many women's heads split open due to police baton attack. Swollen hands and feet of children.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.