मतांपुरता मराठा समाजाचा वापर होतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:31 AM2021-01-23T04:31:14+5:302021-01-23T04:31:14+5:30

फोटो महाकाळा (अंकुशनगर) : मराठा समाजातील नेते मतांपुरतेच समाजाचा वापर करीत असल्याची टीका बाबाराजे देशमुख यांनी केली. मराठ्यांनी आंदोलने ...

The Maratha community is being used for votes | मतांपुरता मराठा समाजाचा वापर होतोय

मतांपुरता मराठा समाजाचा वापर होतोय

Next

फोटो

महाकाळा (अंकुशनगर) : मराठा समाजातील नेते मतांपुरतेच समाजाचा वापर करीत असल्याची टीका बाबाराजे देशमुख यांनी केली. मराठ्यांनी आंदोलने ही हक्काच्या आरक्षणासाठी उभी केली असून, न्याय मागणी मान्य होईपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचा इशाराही देशमुख यांनी दिला.

अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी बाबाराजे देशमुख यांनी मार्गदर्शन केले. मराठा समाजातील मुलं-मुली शिक्षणामध्ये आरक्षण नसल्याने आत्महत्या करत आहेत. सरकार येईल सरकार जाईल. सरकार म्हणजे तुम्ही-आम्ही जन्माला घातलेलं बांडगूळ असल्याचे सांगत त्यांनी मराठा समाजातील नेत्यांवरही टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्यनिर्मितीसाठी मावळा शब्द तयार केला. याच अठरापगड जातीतील एक जात म्हणजे मराठा. अशा मावळ्यांच्या जमिनी गुंठ्यावर व भूमिहीन झाल्याचे चित्र आहे. समाजातील मुलांना आरक्षण मिळावं यासाठी ५८ मोर्चे निघाले, ४२ लोकांनी समाजासाठी बलिदान दिले तरी सरकारला जाग येत नाही. मराठा समाजातील आमदार, खासदार, मंत्री, महामंडळ वाचविण्यासाठी धडपड करतात. परंतु समाजाला आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करीत नाहीत. इतर समाजाचे नेते त्यांच्या समाजावर अन्याय झाला तर समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. परंतु मराठा समाजाचे स्वत:ला नेते म्हणणारे फक्त मतांपुरते समाजाचा वापर करीत असल्याची टीकाही देशमुख यांनी केली. अडचणीच्या काळात मराठा समाजाच्या पाठीमागे कोल्हापूर व साताऱ्याची गादी उभी असते, असे सांगत मराठा समाजाची न्याय मागणी मान्य होईपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचा इशाराही देशमुख यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश महाराज बोचरे यांनी, तर आभार आदिती तळेकर यांनी मानले. यावेळी साष्टपिंपळगाव व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

घोषणांनी दणाणला परिसर

यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एकच मिशन मराठा आरक्षण, एक लढाई समाजासाठी, समाजाच्या लोकांसाठी अशा घोषणा आंदोलक देत होते. आंदोलकांच्या या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Web Title: The Maratha community is being used for votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.