अंतरवाली सराटीजवळ मराठा आंदोलकांनी दुसऱ्या दिवशीही अडविला धुळे- सोलापूर महामार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 06:47 PM2024-09-24T18:47:13+5:302024-09-24T18:47:33+5:30

मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र; धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको, वाहतूक ठप्प

Maratha protesters blocked the Dhule-Solapur highway on the second day near Antarwali Sarati | अंतरवाली सराटीजवळ मराठा आंदोलकांनी दुसऱ्या दिवशीही अडविला धुळे- सोलापूर महामार्ग

अंतरवाली सराटीजवळ मराठा आंदोलकांनी दुसऱ्या दिवशीही अडविला धुळे- सोलापूर महामार्ग

वडीगोद्री ( जालना) : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या आठ दिवसापासून उपोषण करत आहेत. त्यांची  प्रकृती अंत्यत खालावली आहे. सरकार उपोषणाकडे लक्ष देत नसल्याने मराठा बांधवांनी आक्रमक होत आज दुपारी ४ वाजता सलग दुसऱ्या दिवशी धुळे- सोलापूर महामार्ग अडविला.

महिलांसह रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी जोपर्यंत शिष्टमंडळ येत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा पवित्रा घेतला. तब्बल दोन तास महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.दोन्ही बाजूने पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अनेक आंदोलक तर वाहनांच्या टपावर जाऊन बसले होते.

उपोषणामुळे मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे राज्यभरातून मराठा बांधव अंतरवाली सराटीत एकवटला आहे. पाटील पाणी प्या, सलाईन घ्या, अशी विनवणी करत महिला आक्रोश करत होत्या. दरम्यान, परभणी जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अंतरवाली सराटीकडे निघालेली रॅली पोलीसांनी महामार्गावर अडवली. पर्यायी मार्गाने जाण्याची पोलीसांनी विनंती केली. मात्र, आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या दिला. यावेळी 'सरकार हमसे डरती है, पोलिस को आगे करती है' अशा घोषणा देत आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

महामार्गावर वाहतूक खोळंबली 
रास्तारोकोमुळे धुळे ते सोलापूर महामार्गावर पाच ते सहा किलोमीटरपर्यंत दुतर्फा रांगा लागल्या. दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहतूकदार व प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहे. आधीच वातावरणात उकाडा आहे, त्यात महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.

Web Title: Maratha protesters blocked the Dhule-Solapur highway on the second day near Antarwali Sarati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.