जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा वणवा पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:45 AM2018-07-23T00:45:07+5:302018-07-23T00:45:29+5:30
बदनापूर येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम व ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम व ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली
बदनापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चा, बदनापूर समन्वय समितीच्या वतीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यामधे मराठा क्रांती ठोक मोर्चा यांची एक तालुकास्तरीय बैठक झाली. त्यामध्ये या तालुक्यातील पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली़ त्याबाबत समन्वय समितीने माहिती दिली की आतापर्यंत मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी शांततेने एकूण ५८ मोर्चे काढले. परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही. शासनाने त्वरित मराठा समाजास आरक्षण द्यावे तसेच स्वामीनाथन् आयोग,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, बदनापूर येथे पूर्णाकृती शिवस्मारकाची उभारणी करावी अशा विविध मागण्यांसाठी बदनापूर येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये येथील महाराष्ट्र बँकेजवळ २६ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता जालना-औरंगाबाद महामार्गावर चक्का जाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ३० जुलै रोजी येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाकडून मागण्या मंजूर होईपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू राहणार असून या आंदोलनाचे नाव ठोक मोर्चा असले तरी हे आंदोलन शांततेने करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याकरिता समन्वय समितीच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक सर्कलमधे जाऊन आंदोलनाविषयी जनजागृती करण्यात आली आहे. हे आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी संयोजकांनी केले.
तीन टप्प्यांत होणार आंदोलन; मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय
जालना : आरक्षणाविषयी राज्यकर्त्यांचे वेळकाढू धोरण मराठा समाजातील लोकप्रतिनिधींची उदासिनता यामुळे संतप्त असलेल्या मराठा समाजातर्फे राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात मंगळवारपासून तीन टप्यांत आंदोलन केले जाईल, असा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. मराठा ठोक मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरवून सर्वानुमते २४ जुलै रोजी जालना शहरात तिरडी मोर्चा काढण्याचे ठरले.
सकाळी ११ वाजता शिवाजी पुतळा येथून मोर्चास प्रारंभ होईल. विविध मार्गावरून जात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिरड्यांचे दहन केले जाणार आहे. व धरणे आंदोलन होईल. २६ जुलै रोजी जिल्हाभरातील शासकीय कार्यालये बंद ठेवली जाणार आहेत. तर २६ जुलै रोजीच जिल्हाभर समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन केले जाईल. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर हे आंदोलन होणार असल्याने एकाही रस्त्यांवरून वाहतूक होऊ दिली जाणार नसल्याचे निश्चित करण्यात आले.
प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीची सुरूवात झाली. यावेळी तरूणांसह समाज बांधवांनी होत असलेल्या अन्याय अत्याचार व आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबईतील महामोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेले प्रत्येक तालुकास्तरीय मराठा वसतिगृह उभारण्याचे आश्वासन अद्याप पाळले नाही. दोन दिवसांपूर्वी नोकर भरतीत मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असला तरी याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत शासकीय नोकर भरती होऊ देणार नसल्याचा इशारा समाज बांधवांनी दिला.
सूतगिरणीजवळ बसवर दगडफेक
जालना : परळी येथे १८ जुलैपासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठोक मोर्चात मराठा समाजबांधव आरक्षणासाठी ठाण मांडून आहेत. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालना तालुक्यातील इंदेवाडीजवळील सूतगिरणीजवळ १० ते १५ युवकांनी अचानक पैठण आगाराच्या बसवर (एम.एच. १४-बी.टी.००८०) दगडफेक करून, सरकारविरुद्ध रोष व्यक्त केला. यामध्ये बसच्या समोरील काचा फुटून १३ हजारांचे नुकसान झाले. ही घटना २२ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. पैठण येथून अंबडमार्गे जालना येथे येणाऱ्या बसवर जालना शहराजवळील सूतगिरणीजवळ अचानक एक मराठा लाख मराठा असे म्हणत बसवर दगडफेक करण्यात आली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात बस चालक मच्छिंद्र पराजी मगर (रा. पैठण जि. औरंगाबाद) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात १० ते १५ युवकांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. तपास एपीआय बोरसे करीत आहेत.
भोकरदन : मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने भोकरदन - जालना रोडवरील बरंजळा साबळे पाटीजवळ रास्ता रोको अदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , शासनाने मराठा आरक्षण जाहीर करण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसून, कोपर्डी हत्याकांडातील आरोपीना पाठीशी घालण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत शासनाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे मराठा समाजावर मोठा अन्याय होत आहे. तरी शासनाने मराठा आरक्षण तात्काळ जाहीर करावे, या मागणीसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी सकाळी बंरजळा पाटीवर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.