मराठा आरक्षण हेच आता माझ्यावरील उपचार: मनोज जरांगे पाटील, वैद्यकीय पथकाला परत पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 05:32 AM2023-10-27T05:32:14+5:302023-10-27T05:32:32+5:30
आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शासन, प्रशासन पातळीवरून कोणी संवाद साधला नसल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क, अंतरवाली सराटी (जि. जालना) : अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला. मराठा आरक्षण हेच माझ्यावरील उपचार आहेत, असे सांगत वैद्यकीय पथकाला परत पाठविले. आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शासन, प्रशासन पातळीवरून कोणी संवाद साधला नसल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी शासनाला दिलेला ४० दिवसांचा कालावधी संपला. यामुळे जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यात ठिकठिकाणीही साखळी उपोषण केले जात आहे.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागांतील युवक अंतरवाली सराटी गावात येऊन जरांगे पाटील यांची भेट घेत होते. जरांगे यांची तपासणी करण्यासाठी वडीगोद्री येथील डाॅ. शीतल कुटे व आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम आली होती. परंतु, जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला.
तोडफोडीचे समर्थन नाही
आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. आपण तोडफोडीचे समर्थन करीत नाही. गुणरत्न सदावर्ते यांच्या टीकेला आपण उत्तर देणार नाही, असे सांगत मराठा आरक्षणासाठी आपण उपचारही घेणार नसल्याचा पुनरुच्चार जरांगे पाटील यांनी केला.
आरक्षणाच्या मागणीसाठी तिघांनी संपविले जीवन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता समाजातील तरुण टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत. गुरुवारी मराठवाड्यात तिघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली टेंभी (ता. घनसावंगी) येथील शिवाजी अण्णाकिसन माने (४५) यांनी गुरुवारी सकाळी घरामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. अंतरवाली टेंभी येथील साखळी उपोषणात ते सहभागी झाले होते. नंतर ते घरी गेले आणि दरवाजाच्या कोंड्याला रुमाल बांधून गळफास घेतला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपतगाव येथे गणेश काकासाहेब कुबेर (२८) या तरुणाने गुरुवारी दुपारी गळफास घेत मृत्युला कवटाळले. आत्महत्येपूर्वी त्यांनी शालेय पाटीवर ‘मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माझा मृतदेह जाळू नका’, असा मजकूर त्याने लिहून ठेवला होता. हिंगोली जिल्ह्यात देवजना येथील कृष्णा ऊर्फ लहू यशवंतराव कल्याणकर (२५) या तरुणाने बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. ‘मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे’ अशा आशयाची चिठ्ठी त्याच्या खिशात आढळली.