शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही अन् पेलणार नाही- मनोज जरांगे
By विजय मुंडे | Published: October 22, 2023 03:45 PM2023-10-22T15:45:03+5:302023-10-22T15:46:03+5:30
प्रत्येक सर्कलमध्ये अगोदर साखळी नंतर आमरण उपोषण
अंतरवाली सराटी (जि.जालना) : शासनाने घेतलेल्या मुदतीत मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी आरक्षण द्यावे. अन्यथा २५ तारखेनंतर सुरू होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही आणि २८ ऑक्टोबरपासूनचे आंदोलन सरकारला पेलणार नाही, असा इशारा अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. शांततेचे युद्ध काय असते हे सरकारला आणि देशाला दाखवून देवू असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी शासनाला दिलेली मुदत संपली आहे. या पार्श्वभूमीवर मुदतीत आरक्षण जाहीर झाले नाही तर पुढील आंदोलनाची दिशा काय असेल याची माहिती देण्यासाठी रविवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे बोलत होते. सरकारने घेतलेल्या मुदतीत महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण जाहीर केले नाही तर २५ तारखेपासून आपण अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहोत. या कालावधीत उपचारही घेतले जाणार नाहीत. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कायद्याच्या पदावर बसलेल्या कोणत्याही राजकीय नेत्याला आमच्या गावात येवू दिले जाणार नाही. आरक्षण घेवून आले तरच गावाची शिव ओलांडू देणार आहोत.
२५ तारखेपासून महाराष्ट्रातील प्रत्येक सर्कलमधील मोठ्या गावात साखळी उपोषण सुरू होणार आहेत. २८ पासून त्याच साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होणार आहे. याची सर्कलनिहाय तयारी केलेली आहे. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात एकत्र येवून सरकार जागे करण्यासाठी कॅन्डल मार्च काढावा. ही दिशा आणि हे शांततेचे आंदोलन सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील हे शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही आणि दुसऱ्या टप्प्यातील आरक्षणाची दिशा २५ ऑक्टोबरला जाहीर करणार आहोत. ती दिशा सरकारला पेलणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला. महाराष्ट्रातील पाच कोटी मराठे हे आंदोलन चालविणार आहेत. त्यामुळे शासनाने २४ ऑक्टोबरच्या आत निर्णय घ्यावा, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.
उग्र आंदोलन करू नका, आत्महत्या करू नका
मराठा आरक्षणाचा मुद्दा शांततेच्या आंदोलनाने पुढे आला आहे आणि त्याच मार्गाने आपल्याला आरक्षण मिळवायचे आहे. त्यामुळे कोणीही उग्र आंदोलन करू नये.आपले त्याला समर्थन नाही. कोणीही आत्महत्या करू नये. त्याऐवजी माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही आंदोलनात सहभागी व्हावा, समाजाला न्याय द्याचा आहे. तुमच्या पाठबळाशिवाय, साथीशिवाय मराठा समाजाला न्याय मिळणार नाही, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.