तणावपूर्ण वातावरण, जमावाने चार बस पेटवल्या; अशी आहे परिस्थिती...
By विजय मुंडे | Published: September 1, 2023 10:23 PM2023-09-01T22:23:25+5:302023-09-01T22:24:39+5:30
आंदोलकांची दगडफेक, पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह आंदोलकही जखमी
जालना: मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषण करणाऱ्यांना उपचारासाठी नेण्याच्या कारणावरून शुक्रवारी दुपारी निर्माण झालेल्या वादातून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांचा लाठीचार्ज सुरू होताच आंदोलकांनी दगडफेक केली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत सतराहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वीसहून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त जमावाने चार बस पेटवून दिल्या असून, वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजबांधवांनी २९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर- सोलापूर महामार्गावर मोर्चा काढला होता. त्यानंतर अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाइलद्वारे आंदोलकांशी संवाद साधून उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. शिवाय मराठा आरक्षणाच्या दृष्टीने शासन सकारात्मक पावले टाकत असल्याचे सांगितले होते.
उपोषणकर्त्यांनी उपचार घ्यावेत, यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. शुक्रवारी दुपारीही मोठ्या फौजफाट्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांनी उपचार घ्यावेत, यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी प्रशासनाकडून जरांगे यांना उपचारासाठी नेण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने आंदोलक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. त्यानंतर संतप्त आंदोलकांनीही दगडफेक सुरू केली. दगडफेक सुरू होताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेने संतप्त झालेल्या जमावाने छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर महामार्गावर चार बससह एक खासगी वाहन पेटवून दिले.
पोलिस अधिकारी, कर्मचारी, आंदोलक जखमी
या घटनेत डीवायएसपी सचिन सांगळे यांच्यासह जवळपास अठराहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर अंबड उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. अंतरवाली सराटी येथील दोन महिलांसह वीसहून अधिक आंदोलकही जखमी झाले असून, काहींवर वडीगोद्री येथील रुग्णालयात, तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
गोळीबार केल्याचा आरोप
पोलिसांनी अचानक लाठीचार्ज करीत आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फाेडल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. दगडफेक सुरू झाल्याने एकच धावपळ उडाली होती. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केल्याची चर्चा सुरू झाल्याने परिसरात आणखी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु पोलिस दलाच्या वतीने गोळीबार झाल्याचा आरोप फेटाळण्यात आला.