शासनाला 2 महिन्यांचा वेळ, दगाफटका झाल्यास आर्थिक नाड्या आवळणार; जरांगे पाटलांचा इशारा
By विजय मुंडे | Published: November 2, 2023 08:28 PM2023-11-02T20:28:41+5:302023-11-02T20:31:09+5:30
साखळी उपोषण सुरूच राहणार, आत्महत्या करू नका
- विजय मुंडे
जालना / वडीगोद्री : मराठवाड्याचे आज भागले असते, परंतु सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ही लढाई सुरू आहे. ही मोठी लढाई आहे आणि जिंकायची आहे. आरक्षण कायद्यात टिकले पाहिजे. यासाठी शासनाला दोन महिन्यांचा वेळ देवू. आता दगाफटका झाला तर यांच्या सर्व नाड्या आवळण्यासाठी मुंबईच्या बाहेर कोट्यवधी मराठे बसतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या नवव्या दिवशी बुधवारी निवृत्त न्यायमूर्तींसह शासनाच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.
मराठवाड्यात १३ हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्या नोंदीच्या आधारे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत होते. परंतु, आम्हाला ते मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी समिती राज्यभरात काम करावे, मराठवाडा आणि राज्याचा डाटा मिळून समितीने दोन महिन्यात अहवाल द्यायचा आणि त्याच्याआधारे सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी. सख्या परिवारातील लोकांना, सख्खे रक्ताचे नातेावाईक, रक्ताचे सर्व सोयरे आणि राज्यातील मागेल त्या गरजवंत मराठ्यांना त्याच अहवालाच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे. अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
राज्य मगासवर्ग आयोग, शिंदे समिती, सल्लागार समितीला कम करायचे आहे. मराठ्यांना टिकणारे आरक्षण देण्यासाठी दोन महिने देवू. दोन महिन्यात दगाफटका झाला तर मुंबईच्या नाड्या बंद करू. यांना घराच्याबाहेर पडता आले नाही पाहिजे, असे तीव्र आंदोलन उभे करू, असा इशाराही त्यांनी दिला.
यांनी केली जरांगे पाटील यांच्याशी चर्चा
मंत्री उदय सामंत, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री संदीपान भुमरे, आ. बच्चू कडू, नारायण कुचे, मंगेश चिवटे, निवृत्त न्यायाधीश एम.जी. गायकवाड, निवृत्त न्यायाधीश सुनील सुक्रे, जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी यशस्वी चर्चा केली.
बच्चू कडू यांची शिष्टाई आली कामी
माजी मंत्री आ. बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी मंगळवारी रात्री चर्चा केली होती. त्यानंतर आज निवृत्त न्यायमूर्ती व शासनाचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे आले. सोबत आ. बच्चू कडू हे ही होते. या आंदोलनादरम्यान आ.कडू यांनी केलेली शिष्टाई कामी आली आणि जरांगे पाटील व मराठा समाजाने शासनाला दोन महिन्यांचा वेळ दिला.
साखळी उपोषण सुरूच राहणार, आत्महत्या करू नका
आजपासून आमरण उपोषण बंद करा. साखळी उपोषण सुरू ठेवा. उग्र आंदोलन करू नका. कोणीही आत्महत्या करू नका. पुढील लढाईची तयारी माझ्यासोबत करा. पुढे मोठा लढा लढायचा आहे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.
महाराष्ट्रातील गुन्हे मागे घ्या
महाराष्ट्रात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. अंतरवालीतील गुन्हे १५ दिवसांत मागे घेणार आणि उर्वरित गुन्हे एका महिन्यात मागे घेणार असा शब्द शिष्टमंडळाने दिल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.