Video: "एक मराठा, जमला लाखो मराठा"; अंतरवालीतील सभास्थळी मध्यरात्रीच जनसागर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 09:26 AM2023-10-14T09:26:30+5:302023-10-14T09:32:22+5:30
जरांगे पाटील यांच्या विराट सभेसाठी मराठा बांधवांनी स्वयंस्फूर्तीने अंतरवाली सराटी गाव गाठलं आहे
जालना - धुळे-सोलापूर महामार्गावरील अंतरवाली सराटी परिसरातील रामगव्हाण रोडवरील १०० एकरांत शनिवारी दुपारी १२ वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. सभेसाठी १० फूट उंचीचे व्यासपीठ उभे करण्यात आले आहे. तसेच जरांगे यांना प्रवेश करण्यासाठी ३ फूट उंचीचे ५०० फूट लांब रॅम्प करण्यात आले आहे. या सभेसाठी एक दिवस अगोदरच राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजबांधव अंतरवाली सराटी गावात पोहोचले आहेत. त्यामुळे, मध्यरात्रीच सभास्थळी लाखोंचा जनसागर पाहायला मिळाला. एका मराठा बांधवाच्या हाकेवर लाक मराठा समाजबांधव एकत्र आल्याचं दिसून आलं.
जरांगे पाटील यांच्या विराट सभेसाठी मराठा बांधवांनी स्वयंस्फूर्तीने अंतरवाली सराटी गाव गाठलं आहे. सभेस्थळी जाऊन तेथील फोटो आणि व्हिडिओज अनेकांनी सोशल मीडियातून शेअर केले आहेत. काहींनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मध्यरात्री जमलेला जनसमुदायही दाखवून दिला आहे. त्यामुळे, इतिहासात पहिल्यांदाच एका सर्वसामान्य माणसाने दिलेल्या हाकेला धावून लाखो मराठा बांधव जमा झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे येथे येणाऱ्या लाखो जनांसाठी हजारो स्वयंसेवकही पुढे आले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून सभेसाठी येणाऱ्या लोकांची सेवा केली जात आहे. कुणी मोफत पाणी वाटत आहे, कुणी मोफत चहा देत आहे, कुणी मोफत नाश्ता देत आहे. तर, वैद्यकीय सेवा सुविधांचीही सोय करण्यात आली आहे. नांदेड, जालना येथील तरुणांनी तातडीची वैद्यकीय सेवा देण्यासाठी २० रुग्णावाहिका सभास्थळी तैनात गेल्या आहेत. दरम्यान, बीड-जालना या मार्गावरुन जाणाऱ्या गाड्यांमध्ये बिघाड झाल्यास त्यांची गाडी दुरुस्त करुन देण्याचं कामही येथील मॅकेनिक स्वयंसेवकांनी हाती घेतलं आहे. त्यासाठी, दोन दिवस या मार्गावर मॅकेनिक लोकांचं पेट्रोलिंग असणार आहे.
८० एकरावर वाहन पार्किंग
वडीगोद्री कृषीउत्पन्न बााजर समितीच्या आवारातील ६२ एकर, धुळे-सोलापूर महामार्गावरील दोदडगाव येथे ६ एकर, सभास्थळाजवळ शिवारात ६ एकर, रामगव्हाण येथे ६ एकर, गरजेनुसार समर्थकारखाना अंकुशनगर, वडीगोद्री- जालना महामार्गावरील धाकलगाव शिवारात गरजेनुसार वाहनांची पार्किंग केली जाणार आहे.
१० हजार स्वयंसेवक
या सभेच्या नियोजनासाठी सभास्थळी दहा हजार स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. शिवाय पाच लाख पाणी बॉटल्स, ५० पाण्याचे टँकर राहणार आहेत.
११० रुग्णवाहिका
सभास्थळी व परिसरात तब्बल ११० रुग्णवाहिका राहणार असून, यात ३५ रुग्णवाहिका या कार्डियाक आहेत. ३०० डॉक्टर, ३०० परिचारिकांचा स्टाफ कार्यरत राहणार आहे. शिवाय अत्यावश्यक सेवेसाठी ४० खाटा राहणार आहेत. अग्निशमन विभागाची १० वाहनेही नियुक्त करण्यात आले आहेत.
२५ मोठे स्क्रीन
सभास्थळावर १००० लाऊड स्पीकर लावण्यात आले असून, विविध ठिकाणी २५ मोठे स्क्रीन राहणार आहेत. सभास्थळावर येण्यासाठी ७ प्रवेशद्वार करण्यात आले आहेत.
मुक्कामाच्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था
अनेक मराठा समाजबांधव मुक्कामी येत आहेत. मुक्कामी येणाऱ्या समाजबांधवांसाठी वडीगोद्री, अंकुशनगर, महाकाळा आदी ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
सभास्थळी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस अधीक्षकांसह तीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक, ६ डीवायएसपी, २१ पोलिस निरीक्षक, ५७ सहायक पोलिस निरीक्षक व फौजदार, १००० पोलिस अंमलदार, २०० वाहतूक शाखेचे कर्मचारी, ‘एसआरपीएफ’ची एक तुकडी, ‘बीडीडीएस’चे चार पथके कार्यरत राहणार आहेत. शिवाय चार ड्रोनद्वारे सभास्थळाच्या परिसरात पाहणी केली जाणार आहे.