संघर्ष वाढणार? ओबीसी नेत्याकडूनही अंतरवाली सराटीतच आमरण उपोषणाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 02:08 PM2024-06-12T14:08:23+5:302024-06-12T14:19:44+5:30
लक्ष्मण हाके यांनीही मी अंतरवाली सराटी इथंच ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राणांतिक उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे.
Manoj Jarange Patil ( Marathi News ) :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू आहेत. एकीकडे, जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असतानाच आता ओबीसी समाजातूनही आक्रमक भूमिका घेण्यात आली असून ओबीसी नेते आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांनीही मी अंतरवाली सराटी इथंच ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राणांतिक उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे.
"ओबीसींचं सामाजिक न्यायाचं आरक्षण वाचवण्यासाठी मी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतरवाली सराटी इथंच मी उपोषण करणार असून याबाबत माझी अंतरावाली गावातील आणि आसपासच्या भागातील नागरिकांशी चर्चा झाली आहे," अशी माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. ज्या गावात मनोज जरांगे उपोषण करत आहेत, त्याच गावात हाके यांनीही उपोषणाची भूमिका घेतल्यास दोन समाजात संघर्ष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागणार आहे.
आज शिष्टमंडळ भेटणार
"सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झालेत. अंमलबजावणी करायची असल्यास एवढा वेळ थोडाच लागतो. आज संध्याकाळपर्यंत कळेल काय विषय आहे, नाही कळलं तर सलाईन काढून टाकू. एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवणे ही माझी चूक नाही. मी समाजासाठी मरेपर्यंत लढणार आहे," अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी सरकारचे एक शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीस जाणार असल्याची माहिती आहे.
छगन भुजबळ, लक्ष्मण हाके यांच्यावर पुन्हा टीका
''त्याला काही कळत नाही, ते कामातून गेलेले. एवढा ओबीसी अडचणीत आला असता का? बधीर आहे तो'', असा हल्ला मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांचेवर चढवला. तसेच लक्ष्मण हाके अंतरवाली सराटी येथे उपोषण करणार असल्याची माहिती आहे. ''कुठून पण उपोषण कर, मी आणि माझा समाज किंमत देत नाही'', अशी टीका हाके यांच्यावर जरांगे यांनी केली.