विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मॅरेथॉन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:41 AM2019-09-17T00:41:12+5:302019-09-17T00:41:40+5:30
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तीन ते चार तास मॅरेथॉन बैठक घेऊन योजनांचा आढावा घेऊन, रखडलेल्या योजना तातडीने मार्गी लावण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येत्या आठवड्यात विधासभेची आचारसंहिता घोषित होणार आहे. त्यापूर्वी सर्व लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी लगीनघाई करत आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तीन ते चार तास मॅरेथॉन बैठक घेऊन योजनांचा आढावा घेऊन, रखडलेल्या योजना तातडीने मार्गी लावण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दक्षता समितीसह अल्पसंख्याक विभाग, सामाजिक न्याय विभाग, पाटबंधारेसह अन्य विभागांच्या योजनांचा आढावा दोन्ही मंत्र्यांनी अत्यंत बारकाईने घेतला. यावेळी अधिकाऱ्यांना काही प्रश्नांची उत्तेरेही देता आली नाहीत, त्यामुळे पालकमंंत्री लोणीकर यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाकडून कुठल्याच योजनेला पैसे कमी पडत नसताना त्याची अंमलबजावणी होत नसेल, तर शासनाची यातून बदनामी होते, हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे असेही त्यांनी नमूद केल्याचे सांगण्यात आले.
दक्षता समितीच्या बैठकीत आढावा घेताना अधिका-यांनी सांगितले की, उज्ज्वला गॅस योजनेतून जवळपास ९० हजार २४८ कुटुंबांना गॅसचे वाटप करण्यात आले असून, जवळपास तीन लाख ४१ हजार कुटुंबांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. धान्याचा काळाबाजार रोखण्यायसाठी जिल्ह्यातील एक हजार २०० स्वस्तधान्य दुकानांमध्ये ई-पॉस मशीनव्दारेच धान्यवाटप केले जात असल्याचे सांगण्यात आले. यंदा कमी पाऊस लक्षात घेता टंचाईवर आतापासूनच नियंत्रण करण्याची गरज असल्याचे लोणीकर आणि राज्यमंत्री खोतकरांनी नमूद केले. आजच ग्रमीण भागातील पाणी टंचाईची स्थिती गंभीर असल्याचे सांगून, त्याचे नियोजन करण्याचे सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांचा आढावा अभियंता कडलक यांनी सांगितला. समाज कल्याण विभागाचे एकूण ११ वसतिगृहे असून, त्यातील विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. अल्पसंख्याक विभागाकडूनही आढावा घेण्यात आला.
यावेळी सेवलीसह घनसावंगी आणि अन्य गावांमध्ये या विभागाने ५० लाख रूपये खर्च केल्याचे सांगण्यात आले. तसेच झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरणाच्या योजनेचा आढावा घेण्यात आला. योवळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यासह अन्य विभागाप्रमुखांची उपस्थिती होती.