मंठा, परतूर तालुक्यात व्यापारपेठ कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:53 AM2018-07-25T00:53:33+5:302018-07-25T00:53:51+5:30
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शुक्रवारपासून चार दिवस ठिय्या आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्यांच्या वतीने मंठा बंदचे आवाहन केले होते. त्याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शुक्रवारपासून चार दिवस ठिय्या आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्यांच्या वतीने मंठा बंदचे आवाहन केले होते. त्याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवली.
मंगळवारी सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. बसेस बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थीही शाळेत येऊ शकले नाहीत. बंदच्या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी व सकल मराठा समाज बांधवांनी मुख्य रस्त्यावरून शासनाच्या विरोधात घोषणा देत आक्रोश रॅली काढली. रॅली मंठा फाट्यावर पोहोचल्यावर राज्य रस्त्यावर ठिय्या देऊन काकासाहेब शिंदे या तरूणाला मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान बसस्थानकाजवळ एमएच २० बीएल १९४८ या क्रमांकाच्या बसवर अज्ञात इसमाने दगड मारल्याची घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली.
परतुरात कडकडीत बंद
परतूर : मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर येथील आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. दरम्यान ‘त्या’ मृत युवकास श्रघदजंली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्र बंद च्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी शहरात मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला प्रतिसाद देण्यासाठी सकल मराठा बांधवांनी सकाळी रॅली काढली. व्यापा-यांनी बंदला मोठा प्रतिसाद देत दुकाना बंद ठेवल्या.