महामार्गावर बस-दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:40 AM2019-07-22T00:40:40+5:302019-07-22T00:41:05+5:30
भरधाव खासगी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : भरधाव खासगी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर घडली. अपघातातील मयत हे औरंगाबाद जिल्ह्यातील शेकटा येथील रहिवासी आहेत.
हमीदखॉ नुरखॉ पठाण (५०) व त्यांची पत्नी ताहेराबी हमीद खॉ पठाण (३९) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. औरंगाबाद तालुक्यातील शेकटा येथील हमीदखाँ पठाण हे त्यांच्या पत्नीसमवेत रविवारी सकाळी दुचाकीवरून (क्र.एम.एच.२०- एफ.एन.६८३४) शेकटा येथून बदनापूरकडे जात होते. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर भरधाव खासगी बसने (क्र.जी.एस.०१-सी.आर.६६६६) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील हमीदखाँ नूरखाँ पठाण व त्यांची पत्नी ताहेराबी हमीद खाँ पठाण यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच सपोनि राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ग्रामीण रूग्णालयात पाठविले. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी शेख शमशोद्दीन शेख लालमियाँ (रा. शेवगा ता.जि. औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बसच्या चालकाविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास भिंगाळे हे करीत आहेत. पठाण दाम्पत्याच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
दुचाकीसाठी वेगळा मार्गच नाही
जालना-औरंगाबाद महामार्ग बनविताना दुचाकीचा विचार करण्यात आलेला नाही. या महामार्गावर वाहनांची वर्दळ अधिक असून, दुचाकीस्वारांचीही संख्या अधिक आहे. परिणामी झालेल्या अपघातात अनेक दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.