शेतवस्तीवर झाडाला गळफास घेऊन प्रेमी युगुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:33 AM2020-02-19T01:33:43+5:302020-02-19T01:34:13+5:30
घनसावंगी तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका विवाहित युवक-युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : घनसावंगी तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका विवाहित युवक-युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. परंतु त्या दोघांचेही विवाह झाले होते. त्या दोघांनाही दोन मुले आहेत. अजय श्रीधर मोरे (३०) (रा.रवना), आणि सुनीता (नाव बदलले आहे) (२३) अशी त्यांची नावे आहेत.
या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय मोरे आणि सुनीता हे दोघे जण अंबड तालुक्यातील लालवाडी येथील एका शेतात असल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी अंबड पोलिसांना दिली. त्यावरून अंबड पोलिसांनी तेथे जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी पोलिसांना वचननामा लिहून दिला. त्यात त्यांनी म्हटले आहे, आमचा दोघांचाही विवाह झालेला असून, आम्हा दोघांना दोन मुले आहेत. असे असले तरी सुनीता आणि माझ्यात प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे तिलाही पत्नीप्रेमाचे वागवेन, असे नमूद केले. यावर दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हा वचननामा पोलिसांनी शनिवारी लिहून घेतला होता.
त्यानंतर हे दोघे घनसावंगी तालुक्यातील हनुमानगर येथील शेत वस्तीवर मुक्कास गेले. ते तेथेच शेती काम करत होते.
दरम्यान मंगळवारी हनुमाननगर परिसरातील एका शेतात अजय मोरे आणि सुनीता यांचे एका झाडाला दोरीने गळफास घेतलेले मृतदेह आढळून आले.
ही आत्महत्या त्यांनी नेमकी कोणत्या कारणामूळे केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसल्याचे सांगण्यात आले.
मंगळवारी रात्री अंबड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
या प्रकरणामुळे हनुमानगर परिसरावर शोककळा पसरली होती.