एमबीबीएस महाविद्यालय : नशिबाने दिले अन् नेत्यांनी गमावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:55 AM2021-03-13T04:55:08+5:302021-03-13T04:55:08+5:30
जालना जिल्हा होऊन आता ४० वर्षे होत आहेत. असे असताना अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने येथे शैक्षणिक वातावरण तयार झाले नाही. ...
जालना जिल्हा होऊन आता ४० वर्षे होत आहेत. असे असताना अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने येथे शैक्षणिक वातावरण तयार झाले नाही. काही मोजक्या संस्था सोडल्यास अन्य कुठल्याच व्यावसायिक संघी येथे नाहीत. त्यामुळे जालन्यातील विद्यार्थ्यांना पुणे, औरंगाबाद अथवा अन्य राज्यात जाऊन शिक्षण घ्यावे लागते. मुंबईतील आयसीटी ही रसायन तंत्रज्ञान संस्था सुरू होऊन दोन वर्षे झाली आहेत. परंतु त्यातूनही जी अपेक्षा होती. ती पायाभूत सुविधा नसल्याने शक्य होताना दिसत नाही. जालन्यात शासकीय अभियांत्रिक महाविद्याय मंजूर झाले होते. सध्याचे जालन्यातील शासकीय तंत्रनिकेतनचा विस्तार करून तेथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्तावही तयार होता. परंतु पुन्हा एकदा राजकीय श्रेयवादात हे महाविद्यालय बंद पडले.
जालन्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आयसीटी ही संस्था संघर्ष करून आणली. परंतु भुवनेश्वर आणि जालना येथील या संस्था एकाच दिवशी सुरू झाल्या होत्या. भुवनेश्वर येथील संस्था आणि जालन्यातील संस्थेची तुलना केल्यास यातून वास्तव समोर येईल. परंतु त्याकडे कुठल्याच राजकीय पक्षाचे लक्ष नाही. एकदा या संस्थेचा शुभारंभ झाल्यानंतर त्यांची ना आढावा बैठक राजकीय नेत्यांनी घेतली, ना प्रशासनाने त्यामुळे चलता हैच्या स्थितीत ही संस्था सुरू आहे.
चौकट
एमबीबीएसचे सर्व सोपस्कार होऊनही..
जालन्यात चार महिन्यांपूर्वी वैद्यकीय शिक्षणमंंत्री अमित देशमुख यांनी स्वत: जालन्यात येऊन पाहणी केली. तसेच अन्य तंत्रांच्या समितीनेदेखील पाहणी करून जालन्यात हे महाविद्याय सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. परंतु नंतर हा प्रस्ताव मंत्री मंडळापुढे येऊ शकला नाही. याउलट परभणीचे आहे. फारसे सोपस्कार आणि तांत्रिक बाजूंची पूर्तता नसतानाही तेथे हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.
जागेच्या मुद्द्यामुळे रखडले
जालन्यातील एमबीबीएस महाविद्यालय सुरू करण्यासाठी तीन जागांचे पर्याय दिले हेाते. त्यातून एकाही जागा ठरली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे महाविद्याय कुठे सुरू करावे या बाबत एका राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीच्या जागेच्या मुद्द्यावरून हे प्रकरण लांबणीवर पडल्याची जोरदार चर्चा आहे.
उस्मानाबादप्रमाणे बॉसकडे हट्ट हवा होता
उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरोग्यमंत्री टोपे यांनी जाहीर वक्तव्य करून ते बॉसकडे गेल्याने मला सार्वजनिक जिल्हा रुग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयाकडे देण्याच्या प्रस्तावावर सही करावी लागल्याचे ते म्हणाले होते. परंतु असाच हट्ट त्यांनी त्यांचे बॉस अर्थात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे धरला असता, तर जालन्याचा प्रश्न निकाली निघाला असता.
चौकट
सामने थे किनारे....
जालना येथे एमबीबीएस महाविद्याय व्हावे यासाठी आपण खूप मोठा पाठपुरावा केला. परंतु ज्या प्रमाणे उस्मानाबाद येथे सर्व पक्षीय नेते एकत्रित आले होते. तशी मोट येथे बांधली गेली नाही. हे महाविद्याय येथे आता मंजूर झाले असते तर, त्याचे श्रेय अर्थतात मला मिळाले असते. परंतु ते होऊ द्यायचे नसल्याने या महत्त्वाच्या प्रश्नातही राजकारण आले. त्यामुळे आपल्याला एक गाणे आठवते जे म्हणजे डुबी दिल की..नय्या सामने थे किनारे याप्रमाणे जालन्याच्या एमबीबीएस महाविद्यालयाचे झाले आहे. परंतु आपण मागे हटणारे नसून, आगामी काळात हे महाविद्यालय जालन्यात आणण्यावर ठाम आहोत.
कैलास गोरंट्याल, आमदार, जालना