परतुरात अडीच कोटी रुपयांची तूर खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:47 AM2020-01-25T00:47:53+5:302020-01-25T00:48:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परतूर : तालुक्यात आजवर अडीच कोटी रुपयांची तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र, चांगला दर मिळत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालुक्यात आजवर अडीच कोटी रुपयांची तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र, चांगला दर मिळत नसल्याने तूर उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
यंदा ढगाळ वातावरण व शेवटी पडलेला पाऊस यामुळे सर्वच पिकांवर वितरित परिणाम झाला. इतर पिकांबरोबर तुरीच्या उत्पन्नातही मोठी घट झाली. एकेकाळी तुरीचे भाव गगनाला भिडले होते. तब्बल बारा ते चौदा हजार रुपये प्रति क्विंटलने ही तूर विकली जात होती. आज या तुरीचे भाव गडगडले असून, ४ हजार ९०० रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. यातच सतत बदलत्या वातावरणाने उत्पन्नही घटले आहे.
आजवर कृउबा. समितीमध्ये तालुक्यातील ४ हजार ९२२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. याची किंमत २ कोटी ४१ लाख १७ हजार ८०० आहे. मात्र, सोयाबीनच्या पिकाला तेजी आली आहे. सोयाबीनचा भाव ४ हजार प्रती क्विंटलवर पोहचला आहे. ३३ हजार ६११ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली असून, याची किंमत १३ कोटी ४४ लाख ४ हजार ४०० रूपये आहे. यासंदर्भात कृउबा. समितीचे सभापती कपिल आकात म्हणाले, यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना तारले आहे. मात्र, उत्पादनात मोठी घट झाली आहे. यातच तूरीला व कापसाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली आहे. बॅकांनी शेतकºयांना त्रस्त न करता पीक कर्जासह इतर कर्ज तातडीने द्यावे.
परतूर तालुक्यात तुरीसोबतच १ लाख २ हजार ८५३ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. याची किंमत ५४ कोटी ३ लाख १३ हजार २०० रुपये आहे. कापसाचे भाव अद्यापही स्थिर असल्याने भाव वाढेल या आशेने अनेक कापूस उत्पादकांनी अद्यापही कापूस विकला नाही.
एकूणच यावर्षी बदलत्या वातारणाने सर्वच पिकांचे उत्पादन घटले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.