नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:37 AM2021-09-16T04:37:37+5:302021-09-16T04:37:37+5:30
जालना : मेडिकल प्रवेशासाठी असलेली नीट परीक्षा न घेण्याचा निर्णय तामिळनाडू शासनाने घेतला आहे. या निर्णयाबाबत जिल्ह्यातील तज्ज्ञांसह विद्यार्थ्यांनी ...
जालना : मेडिकल प्रवेशासाठी असलेली नीट परीक्षा न घेण्याचा निर्णय तामिळनाडू शासनाने घेतला आहे. या निर्णयाबाबत जिल्ह्यातील तज्ज्ञांसह विद्यार्थ्यांनी संंमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींच्या मते चाळणी परीक्षा गरजेची आहे, तर बारावीतील गुणवत्तेच्या आधारे प्रवेश असावेत, असे काहींचे म्हणणे आहे.
बारावीनंतर विविध शाखांना प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारे मुलांचे प्रवेश निश्चित केले जातात. अशाच प्रकारे मेडिकल प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते; परंतु तामिळनाडू शासनाने मेडिकल प्रवेशासाठी असलेली ही नीट परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच बहुसंख्य मुलांनी नीटची परीक्षा दिली आहे. या परीक्षेपूर्वीच त्या न घेण्याचा निर्णय तामिळनाडू शासनाने घेत विधेयकही पारित केले आहे. तामिळनाडू शासनाच्या या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हाभरातील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांसह मुलांमध्येही विविध मतप्रवाह दिसून येत आहेत.
काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?
नीट परीक्षेपूर्वीच एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानुसार तामिळनाडू शासनाने नीट परीक्षा न घेण्याचे विधेयक मांडले. त्याला सभागृहाने मंजुरी दिली आहे. मुलांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश मिळणार आहे.
धक्कादायक निर्णय
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला धरून तो निर्णय नाही; परंतु ज्या मुलांना सुविधा मिळत नाहीत. त्यांना याचा लाभ होईल. मात्र, नीटमधून खरी गुणवत्ता समोर येते.
-राजेंद्र सोनवणे
मेडिकल प्रवेशासाठी असलेली नीट परीक्षा ही गरजेचीच आहे. केवळ बारावीच्या गुणांवर मेडिकलला प्रवेश देणे योग्य वाटत नाही. नीट परीक्षेतून गुणवत्ताधारक मुले पुढे येतात.
-अंकुश सोनवणे
विद्यार्थी म्हणतात...
मेडिकल प्रवेशासाठी नीट परीक्षा गरजेची आहे. अनेक मुले- मुली वर्षभर तासन्तास अभ्यास करून या परीक्षेची तयारी करतात. नीट परीक्षेच्या निकालानुसार मेडिकल प्रवेश व्हावेत.
-संध्या मापारी
मेडिकलसारख्या अभ्यासक्रमासाठी नीट परीक्षा महत्त्वाची आहे. नीट परीक्षेत गुणवत्ताधारक मुले उत्तीर्ण होतात आणि त्यांना मेडिकलसाठी प्रवेश मिळतो.
-सायली पाटील