परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये सुरू होणार जालन्याचे मेडिकल कॉलेज

By विजय मुंडे  | Published: August 23, 2023 12:15 PM2023-08-23T12:15:27+5:302023-08-23T12:15:45+5:30

तात्पुरत्या स्वरूपात कामकाज सुरू करण्यासाठी परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची पाहणी करण्यात आली आहे.

Medical College of Jalana to be started at Nursing Training Centre building | परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये सुरू होणार जालन्याचे मेडिकल कॉलेज

परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये सुरू होणार जालन्याचे मेडिकल कॉलेज

googlenewsNext

जालना : जिल्हावासीयांचे लक्ष लागून असलेल्या मेडिकल कॉलेजच्या प्रशासकीय कामकाजास लवकरच सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी मंगळवारी अधिकाऱ्यांसमवेत कन्हैय्यानगर भागातील जागेची पाहणी केली आहे. शिवाय तात्पुरत्या स्वरूपात कामकाज सुरू करण्यासाठी परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची पाहणी करण्यात आली आहे. वरिष्ठांनी हिरवा कंदील देताच या केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात मेडिकल कॉलेजचे काम सुरू होणार आहे.

गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वैद्यकीय महाविद्यालचा प्रश्न केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. कैलास गोरंट्याल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी आ. कैलास गोरंट्याल यांनी अधिवेशनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलनही केले होते. त्यानंतर शासनाच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालय उभारणीस हिरवा कंदील दिला आहे. १०० विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात पुढील शैक्षणिक वर्षात २०२४-२५ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे तत्पूर्वी वैद्यकीय महाविद्यालय तात्पुरत्या इमारतीत सुरू होणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने वरिष्ठांच्या निर्देशानुसार जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांनी मंगळवारी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत जालना शहरातील कन्हैय्यानगर भागातील जागेची पाहणी केली. त्याशिवाय तात्पुरत्या स्वरूपात मेडिकल काॅलेज सुरू करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची पाहणी करण्यात आली आहे.

या केंद्रात विद्यार्थी बसण्यासाठी असणारा वर्ग, प्रयोगशाळा, मोठा हाॅल तयार करता येणार आहे. यामुळे या केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात मेडिकल कॉलेज सुरू करण्यावर चर्चा करण्यात आली. कन्हैय्यानगर भागातील जागेची पाहणी, परिचर्या प्रशिक्षण केंद्राची इमारत याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाणार आहे. वरिष्ठांनी मंजुरी देताच येथे तात्पुरत्या स्वरूपात मेडिकल कॉलेज सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप घोडके, बांधकाम विभागाचे अभियंता चंद्रशेखर नागरे, कनिष्ठ अभियंता सूळ, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन शहा, डॉ. कुरेशी, आदींची उपस्थिती होती.

आवश्यक ते सहकार्य करू
मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांनी आज कन्हैय्यानगर भागातील जागा, जिल्हा रुग्णालय परिसरातील परिचर्या प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली आहे. मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाणार आहे.
- डॉ. प्रताप घोडके, प्र. जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Medical College of Jalana to be started at Nursing Training Centre building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.