बैठक निष्फळ; मालवाहतूकदारांचा संप सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:24 AM2018-07-24T01:24:11+5:302018-07-24T01:25:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मालवाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरुच होता.
संपावर तोडगा काढण्यासाठी मालवाहतूक दारांचे शिष्टमंडळ आणि मोठ्या उद्योजकांमध्ये तीन ठिकाणी बैठका झाल्या. हमाली देणार नाही अशी भूमिका काही उद्योजकांनी घेतल्यामुळे बैठक निष्फळ ठरली. ज्याचा माल त्याचा हमाल ही अट मान्य होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्णय मालवाहतूकदारांनी घेतला असून मंगळवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्या भेटी मालवाहतूकदार घेणार आहेत.
आॅल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पुकारलेल्या संपात जालना जिल्ह्यातील मालवाहतूकदार संघटना सहभागी झाली आहे.महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर तर मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर जालन्यातील मालवाहतूक व्यवसाय चालतो. भारतातील सर्वात मोठी टाटा स्टील सह नागपूर, रायपूर, वर्धासह सर्वत्रच ज्याचा माल त्याचा हमाल ही पध्दत आहे. मात्र जालन्यातील मोठे उद्योजक हे मान्य करत नसल्याने मालवाहतूक दारांनी संप सुरु ठेवला आहे. चार दिवसात हजारो टन सळया तशाच पडून आहेत. यामुळे यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.