मुहूर्त साधण्यासाठी व्यापारी, ग्राहक सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:47 AM2019-05-07T00:47:27+5:302019-05-07T00:47:48+5:30
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने तसेच वाहन आणि रिअल इस्टेट अर्थात घरखरेदीला महत्व दिले जाते. विशेष करून सोने खरेदीला या दिवशी मोठे महत्त्व आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने तसेच वाहन आणि रिअल इस्टेट अर्थात घरखरेदीला महत्व दिले जाते. विशेष करून सोने खरेदीला या दिवशी मोठे महत्त्व आहे.
ही बाब लक्षात घेऊन सराफा बाजारातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. सध्या दुष्काळी स्थिती असल्याने पूर्वी प्रमाणे मोठ्या प्रमाणावर खरेदी होणार नसली तरी, अनेकांनी मुहूर्त हातचा जाऊ नये म्हणून, पाच ग्रॅम पासून एक ग्रॅम पर्यंतची बुकींग केली असल्याची माहिती भरत ज्वेलर्सचे संचालक भरत जैन यांनी दिली. वाहन बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले. दुचाकी आणि चारचाकी वाहन बाजारात अक्षयतृतीयेला मोठ्या प्रमाणावर खेरदी अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीचे वातावरण होते, ते आता दूर होईल असे सांगण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी गृहखरेदीच्या कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत, त्यामुळे अक्षयतृतीयेच्या दिवशी चांगली बुकींग होईल अशी आशा बांधकाम व्यावसायिक धीरेंद्र मेहरा यांनी सांगितले. एकूणच अक्षयतृतीयेपासून शेतीच्या कामांना मोठ्या प्रमाणावर प्रारंभ करण्यात येतो. काही भागात धूळ पेरणी केली जाते. जालना जिल्ह्यात ही धूळ पेरणी भोकरदन तालुक्यात केली जात असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले.
बाजारपेठ : वाहतुकीत बदल गरजेचा
अक्षय तृतीया असल्याने मंगळवारी सराफा तसेच अन्य दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होणार आहे. ही गर्दी लक्षात घेता मुख्य बाजारपेठेत दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन जाण्यास मज्जाव करावा. जेणे करून वाहतुकीचा होणारा खोळंबा टाळता येणे शक्य होणार आहे.
सोन्याचे दर स्थिर
गुढी पाडव्यानंतर सोन्याच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती. परंतु यंदा हे दरात थोडाबहुत चढ-उतार सोडल्यास जास्त भडकले नाहीत. अक्षयतृतीच्या पूर्वसंध्येला प्रतितोळे दर हे ३१ हजार ८०० रूपये अधिक तीन टक्के जीएसटी असे होते.
- भरत जैन, सराफा व्यापारी