निवडणुकीच्या धामधुमीत शहरात चोरटे अवतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 01:01 AM2019-04-20T01:01:56+5:302019-04-20T01:02:16+5:30
निवडणुकीची धामधूम सुरू असताना पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याने शहरात छोट्या - मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यासह शहरात निवडणुकीची धामधूम सुरू असताना पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याने शहरात छोट्या - मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या संधीचा फायदा घेत भुरटे चोर अवतले असून, याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
महिलेची पोत हिसकावली
जालना येथे घराच्या कंपाऊंडमध्ये बसलेल्या एका ५८ वर्षीय वयोवृध्द महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची दोन तोळ्े सोन्याची पोत कोणीतरी हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी सुधाकिसन बिल्डींग परिसरात घडली. अनंतकुमार शिवकुमार जैस्वाल यांच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकीची चोरी
जालना : शहरातील श्री नानक कापड दुकानासमोर असलेल्या पार्किगमधून कोणीतरी दुचाकी गाडीची चोरी केल्याची घटना १६ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. फुलचंद मनोहर अचलखांब (रा. मानेगाव खालसा) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.