दमदार योद्धा! मराठा आरक्षण लढ्यासाठी जमीन विकणारे मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Published: September 4, 2023 08:30 PM2023-09-04T20:30:52+5:302023-09-04T20:35:02+5:30

मनाेज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे जोरदार मोर्चा काढला आणि अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले

Mighty warrior! Manoj Jarange who sold land for Maratha reservation movement | दमदार योद्धा! मराठा आरक्षण लढ्यासाठी जमीन विकणारे मनोज जरांगे

दमदार योद्धा! मराठा आरक्षण लढ्यासाठी जमीन विकणारे मनोज जरांगे

googlenewsNext

अंतरवाली सराटी (जि.जालना) : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाची आज राज्यातील सत्ताधारी, विरोधकांनीच नव्हे तर देशभरातील नेत्यांनी दखल घेतली आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी माध्यमांचे प्रतिनिधी या गावात ठाण मांडून असून, सर्वत्र एकच विषय मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले बेमुदत उपोषण आणि पोलिसांचा लाठीचार्ज. एकीकडे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना दुसरीकडे मनोज जरांगे यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

१२ वीपर्यंत शिक्षण झालेल्या मनोज जरांगे यांचे मूळ गाव मातोरी (ता.गेवराई) आहे. आई-वडिल गावाकडे राहत असून, सध्या ते पत्नी, एक मुलगा, तीन मुलींसमवेत समवेत अंकुशनगर येथे राहतात. घरची परिस्थिती बेताची असली तरी समाजासाठी अहोरात्र काम करण्याची तळमळ त्यांची आहे. गत काही वर्षांपासून ते मराठा आरक्षणासाठी धडाडीने प्रयत्न करीत आहेत. आरक्षणासाठी त्यांनी दोन एकर जमीन विक्री केली. मराठा आरक्षणासाठी शिवबा संघटनेच्या मार्फत त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयावर काढलेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर राज्यभरात होणाऱ्या मराठा आरक्षणासाठीचे मोर्चे असोत किंवा कोपर्डी प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी होणारे आंदोलन असो यावेळीही त्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. साष्ठपिंपळगाव येथे केलेल्या आंदोलनानंतरही अनेक मागण्या त्यांनी मान्य करून घेतल्या.

मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्यांच्या कुटुंबांना मदत मिळावी, यासाठीही त्यांनी यशस्वी लढा दिला आहे. आरक्षणासाठी शहागड ते मुंबई काढलेली दिंडी असो किंवा साष्टपिंपळगाव येथे केलेले आंदोलन असो या आंदोलनांनी राज्याचे लक्ष वेधले होते. गत २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल राज्याने नव्हे देशाने घेतली आहे. विशेषत: लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. गल्लीपासून- मुंबईपर्यंतचे सत्ताधारी, विरोधी बाकावरील नेतेमंडळी अंतरवाली सराटीत धाव घेत आहेत. आंदोलनाची वाढती तीव्रता पाहता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत उपसमितीची बैठक घेऊन काही निर्णय घेतले आहेत. शिवाय शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

मेलो तरी माघार नाही
मनाेज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे जोरदार मोर्चा काढला आणि अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाच्या सातव्या दिवशीही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. चर्चेशिवाय मार्ग निघत नाहीत हे खरं आहे. परंतु, चर्चेच्या गुऱ्हाळात पहिले पाढे पंचावन्न नको. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मेलो तरी माघार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आरक्षणाचा जीआर काढा लगेच उपोषण मागे घेतले जाईल, अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली आहे.

Web Title: Mighty warrior! Manoj Jarange who sold land for Maratha reservation movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.