जाफराबाद तालुक्यातील पाचशे मच्छीमारांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 01:00 AM2019-01-31T01:00:55+5:302019-01-31T01:01:29+5:30
धरणांमध्ये पाणी नसल्यामुळे मच्छिमार कुटुंबांवरही स्थलांतराची वेळ आली असून, तालुक्यातील जवळपास पाचशे मच्छीमार स्थलांतरित झाले आहे.
प्रकाश मिरगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. तालुक्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत असून, पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. धरणांमध्ये पाणी नसल्यामुळे मच्छिमार कुटुंबांवरही स्थलांतराची वेळ आली असून, तालुक्यातील जवळपास पाचशे मच्छीमार स्थलांतरित झाले आहे.
तालुक्यातील सातही नद्यांना यावर्षी पाणी न आल्याने जिवरेखा, खडकपूर्णा या सारखी मोठी प्रकल्प कोरडीठाक पडली आहे.
जाफराबाद शहरात भोई समाजाची मोठीवस्ती असून, त्यांचा पारंपरिक मच्छीमारीचा व्यवसाय आहे. ऐकाकाळी लहान - मोठे लघु तलाव, पूर्णा, धामणा, केळणा नदीला बारामाही पाणी राहायचे. त्यामुळे व्यवसायही चांगला होयचा. यावर्षी मात्र, पावसाने पाठ फिरवल्यामुळे मच्छिमार अडचणीत सापडले आहे. परिणामी, मच्छिमारी करणाऱ्या कुटुंबावर स्थलांतराची वेळ असून, कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी येथील मच्छिमार पुणे, बारामती, सोलापूर, नगर, उजनी, नाशिक आदी ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी स्थंलातरीत झाले असल्याची माहिती आहे.
जाफराबाद तालुक्याला तसा निसर्गाचा कोप गेल्या तीन वर्षापासून जाणवत आहे. ‘धरण उशाला अन कोरड घशाला’ म्हणायची वेळ आली आहे. परिसरातील वाहून जाणारे पाणी इतर ठिकाणी जात आहेत.
या ठिकाणचे मच्छीमार स्थलांतरित
पावसाळ््याच्या सुरवातीला व्यवसाय करण्यासाठी मच्छीमारांनी अकोलादेव, कोनड, डोलखेडा, भारज या धरणात मत्स्य बीज सोडले होते. मात्र, पाऊस न आल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. जाफराबाद, कुंभारझरी येथील भोई कुटुंब, त्याचबरोबर मेरखेडा, निमखेडा येथील येथील भिल्ल समाज स्थलांतरित झाला आहे.