दुधना काळेगावात युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:21 AM2019-06-21T00:21:12+5:302019-06-21T00:21:49+5:30
शेतात झोपण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा कु-हाडीने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील दुधना कोळेगाव येथे गुरूवारी सकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना / गोलापांगरी : शेतात झोपण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा कु-हाडीने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील दुधना कोळेगाव येथे गुरूवारी सकाळी उघडकीस आली. अमोल नारायण म्हस्के (वय २५) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
जालना तालुक्यातील दुधना काळेगाव येथील शेतकरी अमोल म्हस्के याने शेतात कपाशीची लागवड केली आहे. परंतु, वन्य प्राणी रात्रीच्यावेळी या पिकाचे नुकसान करतात. त्यामुळे अमोल बुधवारी रात्री ११ वाजता शेत राखण्यासाठी गेला होता. सकाळी साडेसहा वाजता शेजारचे कैलास म्हस्के हे शेतात गेले होते. अमोल आणखी का उठला नाही म्हणून त्यांनी त्याला आवाज दिला. परंतु, त्याने प्रतिसाद न दिल्याने ते त्याला बघण्यासाठी गेले. त्यावेळी अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर घटनास्थळी श्वान पथकाला पाचरण करण्यात आले होते.
घटनास्थळावरुन पोलिसांनी काही वस्तू जप्त केल्या आहेत. हा खून शेतीच्या वादातून झाल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी सांगितले.
तीन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
अमोलला दोन भाऊ आहेत. एक आपेगाव येथे महाराज आहे. तर दुसरा गावातच शेती करतो. अमोलचे अलीकडेच २९ मार्च रोजी लग्न झाले होते. सामनगाव येथील त्याची पत्नी आहे. दरम्यान, अमोलचे वडील पांडुरंगांच्या वारीला पंढरपूर येथे गेले होते.
रात्री व्हॉटस्अप स्टेटस केले अपलोड
शेतातील गोठ्यापासून जवळच असलेल्या शेतात अमोलने बाज टाकली होती. रात्री १२ वाजून १९ मिनिटांनी त्याने त्याचे व्हॉटस्अॅप स्टेटस अपलोड केले होते.