जालना जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला सुगीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:40 PM2018-01-22T23:40:56+5:302018-01-22T23:41:10+5:30
गत वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील शासकीय दूध संकलन प्रतिदिन पाच हजार लिटरने वाढले आहे.
बाबासाहेब म्हस्के/जालना : जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढविण्यासाठी दुग्धविकास विकास विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, गत वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील शासकीय दूध संकलन प्रतिदिन पाच हजार लिटरने वाढले आहे.
जिल्ह्यात सध्या ५५ शासकीय संस्थांच्या माध्यमातून साडेदहा हजार लिटर तर समर्थ तालुका दूध संघाच्या माध्यमातून साडेपाच हजार लिटर दूध संकलन केले जाते. गतवर्षीच्या तुुलनेत यात सरासरी पाच हजार लिटरने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढविण्यासाठी दुग्धविकास विभागाकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. विशेषत: सुशिक्षित बेरोजगारांना या व्यवसायाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन प्रोत्साहित केले जात आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नाणीबाई चिखली येथे आतापर्यंत दीडशेहून अधिक बेरोजगारांना तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अंबड तालुक्यातील अनेक युवकांनी मुक्त संचार गोठा पद्धतीने गायींचे पालन करून दूध निर्यातीस सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील शासकीय दूध खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून होणा-या दूध संकलनास याचा फायदा झाला आहे. सध्या शासनाकडून गाईच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये, तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ३६ रुपयांचा दर दिला जात आहे. महिनाभरात एक कोटी ३० लाख, ५० हजारांचे दूध संकलन केले जात असून, दूध विक्रीचे पैसे दर दहा दिवसांनंतर पशुपालकाच्या बँक खात्यावर थेट जमा केले जात आहेत.
-------
शीतकरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित
येथील जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात आलेले शासकीय दूध संकलन व शीतकरण केंद्र आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहे. जिल्हाभरातून संकलित केल्या जाणा-या दुधावर या ठिकाणी आवश्यक प्रक्रिया करून हे दूध पुणे, वणी येथे पाठवले जात आहे.
............
दुधाळ जनावरे वाटपासाठी बैठक
जालना : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेंतर्गत वर्ष २०१७-१८ साठी दुधाळ जनावरांचे गट वाटप व शेळी गट वाटप योजनेच्या लाभधारकांच्या निवडीसाठी निवड समितीची बैठक बुधवारी दहा वाजता जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे. सर्व लाभधारकांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या सभापतींसह पशुसंवर्धन व कृषी अधिका-यांनी केले आहे.
-------------
जिल्ह्यातील दूध संकलनात गती वर्षीच्या तुलनेत पाच हजार लिटरने वाढ झाली आहे. अनेक होतकरू तरुण दुग्धोत्पादनाकडे वळत असून, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन सहकार्य केले जात आहे.
- एल. एम. प्रधान, सहायक दुग्धविकास अधिकारी, जालना.