गोठ्यातील लाखोंचे साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:26 AM2019-11-14T00:26:12+5:302019-11-14T00:27:11+5:30
अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील एका शेतातील जनावरांच्या गोठ्यास मंगळवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील जवळपास एक लाख रूपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले.
रोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील एका शेतातील जनावरांच्या गोठ्यास मंगळवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील जवळपास एक लाख रूपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले.
रोहिलागड शिवारातील गट नंबर ३१३ मध्ये प्रयागबाई सुखदेव तट्टू यांचे शेत आहे. त्यांच्या शेतामध्ये जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यात अंदाजे ५० हजार रूपये किंमतीचा १० क्विंटल कापूस, ठिबक संचचे अंदाजे ३० हजार रूपये किंमतीचे फवारे, १० हजार रूपये किंमतीचे ग्रास कटर व इतर साहित्य होते. मंगळवारी रात्री शॉर्ट सर्किटने या गोठ्यास अचानक आग लागली.
या आगीत आतील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जनावरे बाहेर असल्याने मोठी हानी टळली. या घटनेचा तलाठी नाटकर यांनी पंचनामा केला आहे. प्रशासनाने प्रयागबाई तट्टू यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.