मंत्री उदय सामंत, खासदार संदिपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; तिघांमध्ये तासभर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:57 IST2025-04-16T15:56:19+5:302025-04-16T15:57:23+5:30
सरकारनं मागण्या मंजूर केल्या नाही तर राज्यव्यापी बैठक घेऊन

मंत्री उदय सामंत, खासदार संदिपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; तिघांमध्ये तासभर चर्चा
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार संदिपान भुमरे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज दुपारी शहागडजवळील पैठण फाटा येथील छत्रपती भवन येथे भेट घेतली. यावेळी मंत्री सामंत, खासदार भुमरे व जरांगे पाटील यांच्यात तब्बल एक तास चर्चा झाली.
येत्या 23 तारखेला जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मागच्या दोनवर्षांपासून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मागचं उपोषण सोडताना सरकारनं जरांगे यांना आश्वासन दिलं होतं. आता आश्वासनाची मुदत संपत आहे. त्याआधी मंत्री सामंत यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली.
...तर मुंबईत आंदोलन होणार
कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र न देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित कराव. सरकारला दिलेली मुदत 30 एप्रिलला संपत आहे. त्यामुळं सरकारनं मागण्या मंजूर केल्या नाही तर राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईत आंदोलन करू असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला आहे. कुणीही नाराज माझ्या भेटीसाठी आला तरी समाजाच्या प्रश्नावरच चर्चा करणार मराठा समाजाचे तिनही गॅजेटियर लागू करा, कुणबी नोंदी शोधण्यासाठी वेग द्या असेही जरांगे म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे नाराज असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली असून संजय राऊतांनी शिंदेंच्या कामाचं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. त्यांच्याकडे असलेले दहा पंधरा आमदार त्यांनी व्यवस्थित सांभाळावे, असा सल्ला दिला. तसेच त्यांच्यावर टीका करून आम्हाला संजय राऊत यांना मोठं करायचं नाही असे ही मंत्री सामंत म्हणाले.