दिशाभूल करीत महिलेचे सोन्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 01:08 AM2019-10-24T01:08:03+5:302019-10-24T01:08:26+5:30
जुना जालना भागातील मोमीन गल्ली भागात राहणाऱ्या एका महिलेची दिशाभूल करून तिच्या कडील जवळपास ५० हजार रूपयांपेक्षा अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुना जालना भागातील मोमीन गल्ली भागात राहणाऱ्या एका महिलेची दिशाभूल करून तिच्या कडील जवळपास ५० हजार रूपयांपेक्षा अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मोहिनी महेश खंडाळे ही महिला दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी एकट्या होत्या. त्यावेळी सफारी घातलेला एक इसम त्यांच्याकडे आला. त्याने तुम्हाला घरकुल अनुदानाचा अडीच लाख रूपयांचा धनादेश मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रथम दहा हजार रूपये द्यावेत, असे सांगितले. सदर महिलेने घरी पती नसल्याने माझ्या कडे एवढे पैसे नाहीत, असे सांगितले. परंतु, सोन्याचे दागिने असतील तरी चालेल, असे त्या भामट्याने सांगितले. यावेळी सदरील महिलेने आपल्या कडील सर्व दागिने त्या अनोळखी व्यक्तीच्या स्वाधीन केले.
तो व्यक्ती घरातून पसार झाल्यानंतर सदरील महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात महेश खंडाळे यांनी संपर्क साधून ही माहिती दिली. पोलिसांनी प्रथमदर्शनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारचे आमिष कोण दाखवित असेल तर नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.