लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी ‘मिशन कवचकुंडल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:15+5:302021-09-15T04:35:15+5:30

मोहीम : लसीकरणात जालना राज्यात २४ व्या स्थानावर जालना : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात महत्त्वाचा भाग असलेल्या प्रतिबंधक लसीकरणात जिल्हा राज्यात ...

'Mission armor' to increase vaccination percentage | लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी ‘मिशन कवचकुंडल’

लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी ‘मिशन कवचकुंडल’

googlenewsNext

मोहीम : लसीकरणात जालना राज्यात २४ व्या स्थानावर

जालना : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात महत्त्वाचा भाग असलेल्या प्रतिबंधक लसीकरणात जिल्हा राज्यात २४ व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘मिशन कवचकुंडल’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गावात लसीकरण सहनियंत्रण समिती गठित केली जाणार असून, सरपंचांसह गावातील नागरिकांचा यात सहभाग राहणार आहे. विशेषत: लोकप्रतिनिधींची सक्रिय भूमिकाही यात महत्त्वाचा भाग राहणार आहे.

जिल्ह्यात गत दीड-दोन वर्षांपासून कोरोनाने मोठे थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्युदर वाढला होता. परंतु, प्रशासनाचे प्रयत्न आणि जिल्हावासीयांच्या सहकार्यामुळे कोरोनाची दुसरी लाट शमली आहे. जिल्ह्यात दीड-दोन महिन्यांपासून कमी प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी लसीकरणाची गती मंदावली आहे. पहिला डोस घेतलेल्या ३० हजारांवर नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. ही बाब पाहता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात मिशन कवचकुंडल राबविले जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक आरोग्य केंद्रांतर्गत एकाच दिवशी तीन ते पाच गावात लसीकरण शिबिरे घेतली जाणार आहेत. गावा-गावात लसीकरण सहनियंत्रण समिती गठित केली जाणार आहे. या समितीत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थांचा सहभाग राहणार आहे. अशीच समिती वॉर्डनिहाय तयार करून लसीकरणासाठी जनजागृतीचा उपक्रम राबविला जाणार आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन गावागावात बैठका घेतल्या जाणार आहेत.

जनजागृतीवर भर

मिशन कवचकुंडलअंतर्गत लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने ज्या गावात शिबिर होणार आहे त्या गावात दोन ते तीन दिवस अगोदरच जनजागृती करून ग्रामस्थांना माहिती दिली जाणार आहे. गणेश मंडळे, स्थानिक सामाजिक संघटनांसह विद्यार्थ्यांचे गट, महिला मंडळांचा सहभाग घेण्यासह त्या-त्या भागात सोशल मीडियाचा वापर करून जनजागृती करीत नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले जाणार आहे.

१३ सप्टेंबरपर्यंत झालेले लसीकरण

विभाग पहिला डोस दुसरा डोस

हेल्थ केअर वर्कर १६१५० (१०१ टक्के) ८२९९ (५२ टक्के)

फ्रंटलाइन वर्कर ३२३१७ (१०१ टक्के) १५१४२ (४७ टक्के)

१८ ते ४४ वयोगट २९३०२० (३१ टक्के) ५८१२६ (०६टक्के)

४५ ते ६० वयोगट १६५३०५ (३६ टक्के) ७८६१३ (१७ टक्के)

६१ वर्षावरील १३५११७ (५८ टक्के) ६६७७७ (२९ टक्के)

जिल्ह्यातील कोरोना स्थिती

एकूण बाधित ६१७४२

कोरोनामुक्त ६०५२१

मृत्यू ११९०

सक्रिय रुग्ण ३१

कोट

जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी मिशन कवचकुंडल राबविले जात आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी वेळेवर लस घ्यावी, यासाठी जनजागृती केली जात आहे. गावस्तरावरील लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा, संस्था, महिला गटांचाही यात सहभाग राहणार आहे.

- डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

कोट

शासनस्तरावरून जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लसींचे डोस पुरविले जात आहेत. त्यानुसार गावस्तरावर लसीकरण शिबिराचे नियोजन केले जात आहे. मिशन कवचकुंडलअंतर्गत अधिकाधिक सूक्ष्म नियोजन करून जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.

- डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा लसीकरण अधिकारी

Web Title: 'Mission armor' to increase vaccination percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.