‘ध’ चा झाला ‘मा’; अन् फटका मात्र शेतकऱ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:56 AM2018-05-15T00:56:42+5:302018-05-15T00:56:42+5:30
प्रधानमंत्री फळपीक विम्याचे शासन निर्णयात जिल्ह्यातील काही गावांच्या नावांमध्ये चुका झाल्या आहेत. जालना तालुक्यातील सेवली गावाचे नाव शेताली झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प्रधानमंत्री फळपीक विम्याचे शासन निर्णयात जिल्ह्यातील काही गावांच्या नावांमध्ये चुका झाल्या आहेत. जालना तालुक्यातील सेवली गावाचे नाव शेताली झाले आहे. यापूर्वी याच कारणामुळे तब्बल चार हजारांवर शेतक-यांना मंजूर विमा मिळविताना तीन वर्षे संघर्ष करावा लागला होता.
प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतक-यांना मृग बहरातील मोसंबी, डाळिंब आणि पेरु फळपिकांचा विमा काढून घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. याबाबत कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने काढलेल्या शासन निर्णयामध्ये जिल्ह्यातील काही गावांची नावे चुकली आहेत. तालुक्यातील सेवलीचे नाव शेताली झाले आहे, तर ढोकसाळचे नाव ठोकसाळ झाले आहे. पाचनवडगावचे नाव पांचाळ वडगाव झाले आहे.
या पूर्वी २०१४ मध्ये सेवली येथील ४ हजार २१५ शेतकºयांनी २०१४ मध्ये रबी पीक विम्यापोटी ३ लाख ६० हजार ९३३ रूपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत भरले होते. अतिवृष्टीमुळे रबी पिकांचे नुकसान झालेले असतानाही शासन निर्णयात सेवली गावाचे नाव शेताली असल्याच्या चुकीमुळे विमा कंपनीने नुकसान भरपाई दावा नाकारल्याने शेतक-यांना विमा लाभ मिळाला नव्हता. शेतक-यांची अडचण लक्षात घेऊन मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी संचालकांनी खा. रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून दिल्ली येथील कृषी सहसचिव डॉ. आशिषकुमार भुतानी यांच्या माध्यमातून विमा कंपनीला चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर शेतक-यांना तब्बल दोन वर्षांनी पीकविम्याच्या ६६ लाख तीन हजार ९७० रुपयांचा लाभ मिळाला होता.