सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी मुंबई गाठावी, विशेष अधिवेशनातून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा
By विजय मुंडे | Published: October 28, 2023 01:11 PM2023-10-28T13:11:33+5:302023-10-28T13:12:12+5:30
उपोषणकर्त्यांच्या जिवितास धोका झाला तर शासन जबाबदार; उद्यापासून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा
अंतरवाली सराटी (जि.जालना) : मराठा आरक्षणासाठीचा लढा मनोज जरांगे पाटील यांनी आणखी तीव्र केला आहे. महाराष्ट्रातील गावा- गावात सुरू असलेल्या साखळी उपोषणाचे रूपांतर उद्यापासून २९ ऑक्टोबर आमरण उपोषणात करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. या आमरण उपाेषणात कोणाच्या जिवितास धोका निर्माण झाला तर त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शासन जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आज आमचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातील गावा- गावात सुरू असलेल्या साखळी उपोषणाचे उद्यापासून २९ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणात रूपांतर होणार आहे. शासनाने हे आंदोलन सहज घेवू नये, तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन ३१ ऑक्टोबर पासून सुरू हाेईल. त्याची रूपरेषा ३० ऑक्टोबर रोजी जाहीर करणार आहोत. आमरण उपोषण करताना शांततेत करावे. आपल्या गावात कोणत्या नेत्यांना येवू देवू नका आणि तुम्हीही नेत्यांच्या दारात जावू नका, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. माझ्या शारीरिक त्रासापेक्षा समाजातील पोरांचा त्रास अधिक आहे. त्यांचे करिअर उद्धवस्त होवू नये यासाठी आपण शारीरिक त्रासाचा विचार न करता टोकाचे उपोषण करीत आहोत. सरकारला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सायंकाळी ६ वाजेपर्यंत मिळतील, अशी अशाही त्यांनी व्यक्त केली.
आमदार, खासदारांनी मुंबई गाठावी
दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात होणारे आंदोलन शासनाला सहज राहणार नाही. त्यामुळे शासनाने हे आंदोलन सहज घेवू नये. सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी मुंबई गाठावी, विशेष अधिवेशन घेवून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.