आमदार, खासदारांनो राजीनामे नको, मुंबईतच थांबा; मनोज जरांगेंनी सांगितली वेगळीच रणनिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:44 PM2023-10-31T12:44:27+5:302023-10-31T12:46:20+5:30
राज्यातील अनेक आमदार, खासदार राजीनामा देत आहेत, तर अनेकांनी मुंबई गाठून राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे.
जालना: आपण कोणाला राजीनामा द्या म्हटलं नाही. आमदारकी, खासदारकीचा राजीनामा देताना समाजाचा तोटा होणार नाही याचा विचार व्हावा. तसेच सर्व आमदार, खासदारांनी, माजी मंत्र्यांनी मुंबईत थांबून आरक्षण मिळेपर्यंत शासनाचा पिच्छा सोडू नका, असे आवाहन आज मनोज जरांगे पाटील यांनी केले. अनेक आमदार, खासदार राजीनामा देत आहेत, या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी केलेले आवाहन आंदोलनाच्या वेगळी रणनीती ठरू शकते.
आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. राज्यातील काही मराठा आमदार, खासदारांनी राजीनामा दिला. अनेकांनी मुबईत गाठली असून, तेही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. दरम्यान, सकाळी जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जरांगे म्हणाले, काही आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा का दिला आहे, हे माहीत नाही. त्यांना आम्ही राजीनामा देण्यास सांगितले नव्हते. त्यांच्या राजीनामा दिल्यामुळे मराठा समाजास काय फायदा होणार आहे आणि काय तोटा होईल, हे माहीत नाही. आमदारकी किंवा खासदारकी असेल तर ते सरकारवर दबाब तरी आणू शकतील. परंतु राजीनामे दिले तर ते रिकामे बसतील. आम्हीही रिकामे आणि तेही रिकामे. आत बोलायला कोणी तरी पाहिजे. त्यामुळे सर्व आमदार, खासदारांनी, माजी मंत्र्यांनी मुंबईत थांबून आरक्षण मिळेपर्यंत शासनाचा पिच्छा सोडू नये अशी वेगळी रणनीती जरांगे यांनी सांगितली.
आता थोडा समाज बाकी आहे
गोदरच ६० टक्के मराठा ओबीसी आरक्षणात गेला आहे. थोडे राहिले आहेत.त्यामुळे एकदम ५ कोटी समाज ओबीसीत येईल हा गैरसमज दूर करा. उर्वरित थोडा समाज बाकी आहे. त्यामुळे विशेष अधिवेशन घेवून मराठा समाजाला आरक्षण द्या, त्याला चॅलेंज होणार नाही. ज्यांना घ्यायचे ते घेतील ज्यांना घ्यायचे नाही ते घेणार नाहीत. परंतु, अर्धवट आरक्षण घेणार नाही, असेही जरांगे म्हणाले. तसेच आपल्या आई-बापाच्या कष्टाचे चीज होण्याची वेळ आली आहे. शांततेचे युद्ध आपण जिंकणार आहोत. पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात काय होते ते पाहू. आणखी आंदोलनाचा तिसरा व चौथा टप्पा बाकी आहे. बंद करून काय होणार. थोडे थांबा आपण पाहू काय होते ते. बंद करू नका, उद्रेक करू नका, असे आवाहन आज मनोज जरांगे पाटील यांनी केले