बदनामीसाठी कारस्थान, जालना शहर बाॅम्बने उडवून देण्याच्या पोस्टचा मोबाईल क्रमांक आंध्रातील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 12:17 PM2022-05-09T12:17:04+5:302022-05-09T12:17:53+5:30
आरोपीला पकडण्यासाठी जालना पोलिसांचे पथक रवाना
जालना : जालन्याला बॉम्बने उडवून देण्याची पोस्ट एका तरुणाच्या नावाने व्हॉट्सॲपवर टाकल्याची घटना शुक्रवारी बदनापूर येथे घडली होती. दरम्यान, ही पोस्ट फिर्यादीला बदनाम करण्यासाठी टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. ज्या क्रमांकावरून पोस्ट टाकण्यात आली, तो क्रमांक आंध्र प्रदेशातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शेख अतिक शेख आयुब (वय २९, रा. बदनापूर) यांच्या व्हॉट्सॲपवर शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीने एक पोस्ट टाकली. यात शेख अतिक शेख आयुब हे सुसाईड बॉम्बर असून, ते आयएसआयएस या संघटनेसोबत काम करतात. ७ मे रोजी जालना येथे बॉम्बस्फोट होणार असून, पोलीस रोख सके तो रोख लो... अशी पोस्ट त्या व्यक्तीने केली.
शेख अतिक शेख आयुब यांनी बदनापूर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना सविस्तर माहिती दिली. या प्रकरणी अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, हा क्रमांक आंध्र प्रदेशातील निघाला. शेख अतिक शेख आयुब याने ऑनलाईन लोन घेतले होते. त्याने ते परतदेखील केले होते; परंतु संबंधितांनी आणखी पैशांची मागणी केली होती; परंतु त्याने ती मागणी मान्य न केल्याने हा प्रकार केला असावा, असा संशय असल्याची माहिती पोनि शिवाजी बंटेवाड यांनी दिली.
आरोपीच्या मागावर एक पथक
जालन्याला बॉम्बने उडवून देण्याची पोस्ट दुसऱ्याच्या नावाने टाकणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी बदनापूर पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक लवकरच आरोपीला अटक करेल, अशी माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिली.