मोबाईलची चोरी करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:31 AM2019-03-25T00:31:14+5:302019-03-25T00:31:44+5:30
आठवडी बाजारात नागरिकांच्या मोबाईलची चोरी करणारी टोळी भोकरदन पोलिसांनी शनिवारी मोठ्या शिताफितीने जेरबंद केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : येथील आठवडी बाजारात नागरिकांच्या मोबाईलची चोरी करणारी टोळी भोकरदन पोलिसांनी शनिवारी मोठ्या शिताफितीने जेरबंद केली. आठ मोबाईल आणि एक कार असा ४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
भोकरदन शहरात शनिवारी मोठा आठवडी बाजार भरतो. बाजारात खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून मोठी गर्दी करतात. याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांनी गेल्या तीन महिन्यापासून आठ ते दहा नागरिकांचे मोबाईल लांबवले होते. याची तक्रार नागरिकांनी पोलिसात दिली होती.
याची दखल घेत पोलिसांनी शनिवारी आठवडी बाजारात साध्या वेशात गर्दीमध्ये पोलिसांना पाठवून चोरट्याचा शोध घेतला. एका जणाच्या खिशातून मोबाईल चोरतांना शेख अकिल शेख शब्बीर (३१) रा. कोसाड जि. सुरत याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून चोरीचे सहा मोबाईल हस्तगत केले. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने इतर सहा साथीदारासह मोबाईलची चोरी केल्याची कबूली दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंदन इमले, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साखळे, पोलीस कर्मचारी विजय जाधव, रूस्तुम जैवळ, जगन जाधव, अभिजीत वायकोस, समाधान जगताप यांनी कारवाई करुन मोलासिम तौसीफ गुलामभाई (२९) रा. सुरत, सय्यद शकुर सय्यद नूर याला ताब्यात घेतले.
कृष्णा मोरे यांच्या तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास ज्ञानेश्वर साखळे हे करीत आहे़