राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेत मोदी, फडणवीस लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:26 AM2019-01-24T00:26:52+5:302019-01-24T00:27:10+5:30
एकूणच जनमताने एकवटून या सरकारला हद्दपार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले
लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी : आगामी निवडणुकीत मतदारांनी थापा मारणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला हिसका दाखवण्याची गरज असून, दुष्काळातही हे सरकार दुजाभाव करत असल्याने शेतकयांची होरपळ सुरू आहे. त्यामुळे एकूणच जनमताने एकवटून या सरकारला हद्दपार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. ते घनसावंगी येथे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार यात्रेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षात अच्छे दिनच्या नावाखाली महागाई वाढत गेली. २०१४ मध्ये ५५ रूपये लिटर असलेले पेट्रोल आज ८० रूपयांवर पोहोचले आहे. पंतप्रधान स्वत:ला चौकीदार म्हणवतात. असे असताना मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या, नीरव मोदी हे देश सोडून जातात कसे, असा सवाल त्यांनी केला. सोलापूर येथे पंतप्रधान मोदी आले असताना भ्रष्टाचाराचा आरोप असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख हे व्यासपीठावर होते. ते त्यांना कसे चालतात, असा प्रश्नही मुंडेंनी उपस्थित केला. आगामी निवडणुकीत शेतकरी आणि जनता मोदींना घरचा रस्ता दाखवतील, असेही ते म्हणाले.
खा. रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना त्यांनी शेतक-यांबद्दल दानवेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. दरम्यान शिवसेनेची आता शेळी झाल्याचेही मुंडे यांनी सांगितले. सध्या संपूर्ण देशात चौकीदार चोर है च्या मुद्यावरून रान पेटल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचे ते म्हणाले. त्यावेळी महागाईच्या मुद्यावरून आकांडतांडव करणारा भाजप आता गप्प असल्याने लोकांचे त्यांच्या या बदलत्या विचाराकडे बारकाईने लक्ष असल्याचे सांगितले. मुंडेच्या चौफेर टोलेबाजीचे सभेस उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.